जालना: जायकवाडी- जालना पाणी पुरवठा ही आपण अनंत अडचणींवर मात करून पूर्णत्वास नेलेली आहे. या योजनेचे श्रेय घेऊ पाहणाऱ्या राजेश टोपे यांनी मंत्री असताना योजनेच्या कामास साधी भेट सुद्धा दिलेली नाही. आता अंबडला पाणी देण्याच्या मुद्यावर ते अंबडकरांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला. ही योजना फक्त जालना नगर पालिकेच्या मालकीचीच आहे. त्यामुळे अंबडला पाणी द्यायचे की नाही हे याचा निर्णय जालना पालिकाच घेईल असेही त्यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.जायकवाडी - जालना योजनेतून अंबड पाणी देण्यासंबधी बुधवारी घनसावंगीचे आ. राजेश टोपे यांनी आढावा बैठक घेवून ही योजना शासनाच्या मालकीची असल्याने अंबडला लवकरच पाणी देवू असे म्हटले होते. या संबधी गोरंट्याल यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली. गोरंट्याल म्हणाले की, जायकवाडी - जालना ही २३० कोटी रूपयांची पाणी योजना फक्त जालना शहरासाठीच मंजूर झालेली आहे. त्यामुळे अंबडला पाणी देण्याचा प्रश्नच नाही. आम्ही मानवी दृष्टीकोनातून लोकवाट्याचे १५ कोटी भरल्यानंतर एका महिन्याचे अगोदर बील देवून पाणी मीटरप्रमाणे देण्याची भूमिका घेतली होती.मात्र अंबड पालिकेला ते मान्य नाही. अंबड पालिकेला आतापर्यंत पैसे न भरता पाणी घेण्याची सवय लागलेली आहे. अगोदर जालन्याच्या जुन्या योजनेतून पाणी घेतले. जालन्याला नवीन योजना झाल्याने जुनी योजना आम्ही अंबड पालिकेला दिली. अंबडच्या नगराध्यक्षांनी एका महिन्याचे दीड कोटी रूपये भरण्याची तयारी दर्शवून पाणी विकत द्या अशी मागणी केलेली आहे. यावर बोलतांना गोरंट्याल यांनी अगोदर लोकवाटा भरावा त्याशिवाय अंबडला पाणी देणार नसल्याचे स्पष्ट केले. जालनेकरांना पाण्यासाठी महिनोमहिने प्रतीक्षा करावी लागली. घाणेवाडीतून चर खोदुन जालना पालिकेने जालनेकरांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला. जर योजनेतून आज अंबडला पाणी दिले तर उद्या पैठण आणि परवा रस्त्यावरील सर्वच गावे पाणी मागतील. त्यामुळे या योजनेचे हालही जुन्या शहागड- अंबड जालना संयुक्त पाणीपुरवठा योजनेप्रमाणे होईल. त्यामुळे जालनेकरांवर पुन्हा टँकरचीच वेळ येईल. ती टाळण्यासाठी जालनेकरांनी जागृत होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल हाफिज, प्रमोद रत्नपारखे, डेव्हीड घुमारे, विनोद यादव आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)४अंबडला पाणी देण्यासंबधी मंत्रीमंडळात निर्णय झाला असल्याचे आ.राजेश टोपे यांनी सांगितले, त्यावर गोरंट्याल यांनी टोपेंनी मंत्रिमंडळात पाणी पुरवठा योजनेचे वीज बिल माफ का केले नाही, असा सवाल करून टोपे यांच्याकडून अंबडच्या पाणी प्रश्नावर तेथील जनतेची दिशाभूल होत असल्याचा आरोप करण्यात आला. ४अंबडला पाणी देण्याचा कोणताही निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झालेला नाही. अंबड पालिकेने वॉटर युटीलिटी कंपनीचा प्रस्ताव देवून १० कोटीचा लोकवाटा भरावा. व त्यानंतर पाणी कंपनीकडून विकत घ्यावे. असा निर्णय झालेला आहे. मात्र अंबड पालिका हा लोकवाटा भरत नसल्याने अंबडला पाणी मिळणार नसल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले.
...तर जालनेकरांवर पुन्हा टँकरची वेळ - गोरंट्याल
By admin | Published: November 07, 2014 12:25 AM