जिल्ह्यातील पर्यटनस्थळे गुरुवारपासून खुली झाली. पर्यटकांच्या सुविधेसाठी ‘एसटी’ने वातानुकूलित पर्यटन बस सोडण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार सकाळी ८ वाजता चालक गजानन पवार आणि वाहक पद्माकर आहेर यांनी बस फलाटावर लावली. पहिलाच दिवस असल्याने प्रतिसाद मिळण्याविषयी शंका होतीच, तरीही एक पर्यटक मिळाला तरी बस घेऊन जाण्याचे एसटीने नियोजन केले होते. फलाटावर येणार्या प्रवाशांना अजिंठा लेणीला बस जाणार असल्याची माहिती चालक-वाहकांकडून देण्यात येत होती. परंतु फलाटावर तासभर थांबल्यानंतरही पर्यटक मिळाला नाही. अखेर ही बस रेल्वेस्टेशन परिसरातील एमटीडीसी कार्यालयात नेण्यात आली. परंतु तेथेही कोणी पर्यटक नव्हते. त्यामुळे पुन्हा बस बसस्थानकात आणून फलाटावर लावण्यात आली. तरीही पर्यटक मिळाले नसल्याने बसचा प्रवास रद्द करण्यात आला. ही शुक्रवारीही सोडण्यात येईल, असे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले.
फोटो ओळ..
मध्यवर्ती बसस्थानकात ९ महिन्यांनंतर फलाटावर लागलेली अजिंठ्याची वातानुकूलित पर्यटन बस.