औरंगाबाद : जुलै महिन्याचे १० दिवस संपले असून, मराठवाड्यात अजूनही ३८ चारा छावण्या सुरू आहेत. त्या छावण्यांमध्ये २५ हजार जनावरे आहेत. विभागाला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. आजवर विभागात झालेल्या कमी-अधिक पावसामुळे छावण्यांतील जनावरे शेतकरी घेऊन जात आहेत. उर्वरित छावण्या बंद करण्यात आल्या आहेत.
मे अखेरपर्यंत विभागातील छावण्यांमध्ये पाच लाखांच्या आसपास जनावरे छावण्यांमध्ये होती. त्यात झपाट्याने घट होत गेली असून, २९ जून रोजी चारा छावण्यांमध्ये ६९ हजार जनावरे होती. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विभागात काही ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे छावण्यांतील जनावरांची संख्या घटली. सद्य:स्थितीमध्ये औरंगाबाद, परभणी, बीड आणि लातूर जिल्ह्यांतील ३८ चारा छावण्यांमध्ये २३ हजार ४७६ लहान, तर १ हजार ८१५ मोठे असे एकूण २५ हजार २९१ जनावरे आहेत.
यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले. पूर्व मान्सूनच्या हजेरीने काही विभागात काही ठिकाणची चाऱ्याची व्यवस्था झाली. जूनच्या मध्यानंतर बीड, औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत झालेल्या पावसानंतर बहुतांश छावण्या बंद झाल्या. १५ दिवसांपासून हलक्या पावसाच्या सरी सुरू आहेत. त्यावरच शेतकरी पेरण्यांची कामे उरकत असून, छावण्यांमधील जनावरांच्या संख्येत त्यामुळे घट झाली. जालना जिल्ह्यातील सर्व चारा छावण्या बंद करण्यात आल्या आहेत. येत्या काळात जोरदार पाऊस झाल्यास विभागातील सर्व चारा छावण्या बंद होण्याची शक्यता आहे. जानेवारी २०१९ पासून चाराटंचाई सुरू होती. मार्च महिन्यापासून चाराटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागली. त्यामुळे चारा छावण्यांची संख्या वाढली. विभागात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि उस्मानाबादपैकी सर्वाधिक चाराटंचाई बीड जिल्ह्यामध्ये होती.