औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी १ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत जिल्ह्यात ७४९५९ पुरुष, ३१४१५ महिला मतदार २०६ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्वाधिक ११७ मतदान केंद्रे शहरात आहेत.
निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात १लाख ६ हजार ३७९ मतदार आहेत. त्यात ५ मतदार तृतीयपंथी आहेत. सर्वाधिक ११७ मतदान केंद्रे औरंगाबाद तालुक्यात आहेत. सर्वात कमी प्रत्येकी ५ मतदान केंद्रे खुलताबाद आणि सोयगाव तालुक्यात आहेत. सिल्लोडमध्ये १५, कन्नड १४, फुलंब्री ६, पैठण १५, गंगापूर १४ आणि वैजापूर १५ अशी एकूण २०६ मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रांसाठी ३०६ वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण १८१ टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. स्वीप कार्यक्रमांतर्गत कोरोना पार्श्वभूमी आणि राजकीय पक्षांची जागरूकता, मतदान केंद्र व्यवस्थापन, मतपत्रिकेवर पसंतीक्रमाने मतदान कसे करावे, मतदानाच्या दिवशी मतदारांनी घ्यावयाची काळजी याबाबत जागृती करण्यात आली आहे.
८० रुग्णवाहिका उपलब्ध
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तालुकानिहाय आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये जिल्ह्यात मतदान प्रक्रियेसाठी १०४ अधिकारी, २०६ कर्मचारी, जिल्हा कोविड आरोग्य केंद्र, जिल्हा कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये एकूण ९९ अधिकारी आणि एकूण ८० रुग्णवाहिका उपलब्ध आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.