लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अ़भा़ काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभा व्यासपीठावर जाण्यावरून शुक्रवारी तहसीलदार विद्याचरण कडवकर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यात झालेला वाद आता चिघळला असून, शनिवारी जिल्हा कचेरीत तहसीलदार- नायब तहसीलदार, तलाठी-पटवरी, महसूल कर्मचारी, राजपत्रित अधिकारी महासंघ आदींच्या झालेल्या संयुक्त बैठकीत पानसरे यांना निलंबित करावे, अन्यथा मराठवाडाभर लेखणीबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे़शहरातील नूतन विद्यालयाच्या मैदानावर शुक्रवारी खा़ राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसची संघर्ष सभा झाली़ या सभेच्या वेळी व्यासपीठावर जाण्यावरून परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यात चांगलीच वादावादी झाली होती़ ओळखपत्र दाखवूनही व शासकीय काम असतानाही पानसरे यांनी आपल्या शर्टला धरून प्रवेशद्वारापासून बाजुला काढले व अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप कडवकर यांनी केला होता़ तर या आरोपाचे पानसरे यांनी खंडन करीत तहसीलदार कडवकर हेच सभेच्या ठिकाणी उशिरा आले़ दंडाधिकारी म्हणून यापूर्वीच त्यांच्या विभागाचा एक अधिकारी व्यासपीठाजवळ उपस्थित होता़ शिवाय कडवकर हे मोजक्याच व्हीव्हीआयपी व्यक्तींसाठी असलेल्या प्रवेशद्वारातून इतर दोन-तीन जणांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होते़ सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांना जाण्यास मज्जाव केला़ त्यांना कोणतीही अपमानास्पद वागणूक दिली नाही, असे पानसरे म्हणाले़ या संदर्भात कडवकर यांनी शुक्रवारी रात्रीच जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांची भेट घेवून त्यांच्याकडे तक्रार केली़यावेळी शिव शंकर यांनीही पानसरे यांच्याशी संवाद साधला व याबाबत विचारणा केली़ हे प्रकरण मिटेल, असे वाटत असतानाच शनिवारी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाºयांनी आक्रमक भूमिका घेतली़ जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना, महाराष्ट्र राज्य तलाठी व पटवारी संघ, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना, राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या अधिकाºयांची बैठक झाली़ या बैठकीत पानसरे यांना सोमवारपर्यंत निलंबित करावे, अन्यथा प्रारंभी जिल्हाभर व त्यानंतर मराठवाडाभर टप्प्या टप्प्याने लेखणीबंद आंदोलन केले जाईल़ याची दखल न घेतल्यास राज्यस्तरावर आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला़ या बैठकीला तहसीलदार संघटनेचे विभागीय अध्यक्ष किरण अंबेकर, राजपत्रित महासंघाचे अध्यक्ष अंकुश पिनाटे, सचिव बी़ आऱ पाटील, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण नरमवार, जिल्हाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश जोशी, नायब तहसीलदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मुंडे, तलाठी-पटवारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत काजे आदींची उपस्थिती होती़यावेळी तहसीलदार संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांनी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली व त्यांना याबाबतची माहिती दिली असता, त्यांनी या घटनेविषयी चौकशीचे निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन दिले असल्याचे बगळे म्हणाले़
पोलीस-महसूल अधिकारी यांच्यातील वाद चिघळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:08 AM