छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली तेव्हा काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांचे मोठमोठे होर्डिंग लावले. त्यांना ‘जलसम्राट’ अशी उपाधी देण्यात आली. चार वर्षे उलटली तरी योजना पूर्ण झाली नाही. १३ दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा करणारी ९०० मि.मी.ची जलवाहिनी दुरुस्तीअभावी बंद पडली आहे. त्यानंतरही संबंधित यंत्रणेला खडसावून बोलण्याची हिंमत एकही राजकीय नेता दाखवायला तयार नाही.
शहराला उन्हाळ्यात अतिरिक्त ७५ एमएलडी पाणी मिळावे, यासाठी तब्बल २०० कोटी रुपये खर्च करून ९०० मि.मी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकली. जलवाहिनीतून फक्त २० एमएलडी पाणी येत होते. शहराच्या पाणीपुरवठ्याला यामुळे आधार मिळाला होता. २२ मार्च रोजी फारोळा फाटा येथे ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या बाजूलाच २५०० मि.मी. व्यासाची मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. या कामामुळे ९०० मि.मी. जलवाहिनीचे काही पाइप निखळले होते. दुरुस्तीसाठी म.जी.प्रा.ने तब्बल नऊ दिवस लावले. महापालिकेच्या प्रचंड आग्रहानंतर ३१ मार्च रोजी रात्री ११ वाजता जलवाहिनी कशीबशी सुरू झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता तीच जलवाहिनी फारोळा फाट्यापासून १०० मीटर अंतरावर परत २५०० मि.मी. व्यासाचा पाइप टाकताना फुटली. आज चार दिवस झाले तरी दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. एकूण १३ दिवसांपासून जलवाहिनी बंद आहे. शहराला दररोज २० एमएलडी पाण्याचा फटका बसतो आहे. त्यानंतरही शहरातील राजकीय नेते मूग गिळून गप्प आहेत. जलसम्राटांनी शहराला वाऱ्यावर सोडले का? अशी चर्च नागरिकांमध्ये सुरू आहे.
पाणीपुरवठा विस्कळीत करु नकामहाराष्ट्र जीवन प्राधिकरण शहराला वाढीव ७५ एमएलडी पाणी देऊ शकत नाही. निदान शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या ७००, १२०० आणि नवीन ९०० मि.मी. जलवाहिन्या सुरळीत ठेवाव्यात. या जलवाहिन्यांना धक्का लावू नये. धक्का लावला तर पाइप निखळणे, जलवाहिनी फुटणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे किमान दोन महिने सहकार्य करावे, अशी भूमिका महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतली आहे. कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे अशी वारंवार विनंतीसुद्धा केली.