मराठवाडा मंत्रिमंडळ बैठकीसाठी शासनाकडून काहीही हालचाल नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 11:59 AM2024-09-07T11:59:52+5:302024-09-07T12:00:56+5:30
मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गेल्या वर्षी १६ सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक स्मार्ट सिटी कार्यालयात पार पडली होती. यावर्षीही बैठक होईल, असा दावा सत्ताधारी करीत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन ११ दिवसांवर येऊन ठेपला आहे. अद्याप मंत्रिमंडळ बैठक घेण्याबाबत शासनाकडून काहीही निरोप, माहिती, सूचना मिळालेली नाही. त्यामुळे यावर्षी मंत्रिमंडळ बैठक होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. यावर्षी १६ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद आहे, तर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आणि अनंत चतुर्दशी १७ सप्टेंबर रोजी आहे. श्री गणेश विसर्जनामुळे पोलिस बंदोबस्त तिकडे असेल. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक त्या दिवशी होण्याची शक्यता कमी आहे. सप्टेंबर अखेरीस बैठक होऊ शकते, अशीही चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गेल्या वर्षी १६ सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक स्मार्ट सिटी कार्यालयात पार पडली होती. यावर्षीही बैठक होईल, असा दावा सत्ताधारी करीत आहेत. गेल्या वर्षी ४५ हजार कोटींचे पॅकेज मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले होते. त्यातील किती विभागांची कामे झाली आहेत, याच्या माहितीचे संकलन विभागीय प्रशासनाने सुरू केले आहे. गेल्या वर्षी केलेल्या ४५ हजार कोटींच्या पॅकेजच्या घोषणांमध्ये ३५ हून अधिक विभागांसह सिंचनासाठी १४ हजार कोटींची स्वतंत्र घोषणा केली होती.
काहीही निरोप नाही
मराठवाड्यासाठी मंत्रिमंडळ बैठक घेण्याबाबत अद्याप शासनाकडून काहीही निराेप नाही. त्यामुळे बैठक होणार की नाही, याबाबत ठोस माहिती सांगता येणार नाही.
- दिलीप गावडे, विभागीय आयुक्त
मुख्यमंत्री १६ सप्टेंबर रोजी मुक्कामी येणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १६ सप्टेंबर रोजी मुक्कामी येतील, १७ सप्टेंबर रोजी सिद्धार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभासमोर ध्वजारोहणास हजेरी लावतील. त्यानंतर मुंबईला रवाना होतील, अशी चर्चा सध्या प्रशासकीय वर्तुळात आहे.