औरंगाबाद: शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांना अनेक ठिकाणी शिवसैनिक विरोध करत आहेत. यामुळे शिंदे गटाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी जोरदार आव्हान उभे केल्याचे चित्र आहे. शिंदे गटाला शिवसैनिकांच्या वाढत्या विरोधावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या विरोधात कोणी नाही. फक्त काही लोक काही दिवस कावकाव करतील, नंतर शांत बसतील, असा जोरदार टोला त्यांनी लगावला आहे.
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानतंर अब्दुल सत्तार यांचे आज औरंगाबादेत आगमन झाले. त्यावेळी विमानतळावर त्यांनी माध्यमांशी सवांद साधला. सत्तार पुढे म्हणाले, खाते वाटत दोन दिवसात होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी जबाबदारी देतील ती चोखपणे पार पाडू. पुढील विस्तारात शिरसाट यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री लक्ष देतील. ते नाराज नाहीत, असेही सत्तार म्हणाले.
काहीजण कावकाव करतील शिंदे गटातील आमदारांना मुंबई, पुणे, सोलापूर येथे शिवसेनेकडून विरोध होत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात उभी राहत आहे. यावर प्रश्न विचारला असता सत्तार यांनी जोरदार टीका केली. शिवसेना विरोधात उभी राहिली काय आणि नाही राहिली काय. राज्यातील जनतेच्या कौल मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत आहे. काहीजण काही दिवस कावकाव करतील, नंतर शांत बसतील, असे सत्तार म्हणाले.