गंगापूर: कापसाला भाव नाही, त्यात अवकाळी पावसाने गहू, कांद्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याने आता कर्ज कसे फेडायचे या चिंतेतून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. अशोक भिकाजी सिरसाठ (४७) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना गंगापूर तालुक्यातील वाहेगावा येथे बुधवारी (८) रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडली.
वाहेगाव येथील रहिवासी असलेले अशोक सिरसाठ हे शेती व मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्याकडे असलेल्या शेतीपैकी एक एक्कर गहू तर अडीच एकर क्षेत्रावर कांदा आहे. शेतीसाठी त्यांनी खाजगी कर्ज काढले होते,कापूस पिकातून व गव्हाच्या उत्पादनातून सदरील कर्ज ते चुकते करणार होते. मात्र, कापसाला भाव मिळत नसल्याने अनेक दिवसांपासून पंधरा ते वीस क्विंटल कापूस घरात पडून होता. त्यात देणेकरांनी तगादा लावला होता. त्यामुळे अशोक सिरसाठ हे चिंतेत होते. कापसाचे अपेक्षित पैसे आले नाही तर कर्ज कसे चुकते करायचे याचा प्रश्न त्यांना भेडसावत होता.
दरम्यान, रविवार व सोमवारी अवकाळी पावसाने शेतातील गव्हू व कांद्याचे पीक देखील आडवे पडले. यामुळे अशोक शिरसाठ पूर्णपणे खचले होते. कोणाशीही बोलत नव्हते. पत्नी व मुलाने त्यांची समजूत काढली होती. मात्र, बुधवारी (दि. ८) रात्री ते घरातून निघून गेले. कुटुंबीयांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला मात्र ते कोठेही सापडले नाही. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. ९) सकाळी साडेसात वाजता त्यांच्या चुलत्याच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत अशोक शिरसाठ यांचा मृतदेह आढळून आला. मृत शेतकऱ्याचा मुलगा जयदीप याने गंगापूर पोलिसांत याबाबत माहिती दिली. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.