औरंगाबाद : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मराठवाड्याच्या वाट्याला निराशाच आली. एकाही योजनेला भरीव तरतूद नसल्याने योजना मार्गी लागणार कशा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी योजना दिसत असल्या तरी त्या किरकोळ स्वरुपाच्या असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
वसमत येथे कृषी संशोधन केंद्रवसमत (जि. हिंगोली) येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र, स्थापन करून या केंद्रामध्ये प्रामुख्याने हळद पिकाची उत्पादकता वाढविण्याकरिता संशोधन करण्यात येणार आहे. त्यासाठी १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली.
सोयाबीन व कापूस पिकांसाठी विशेष कृती योजनाविदर्भ आणि मराठवाड्यात कापूस व सोयाबीन लागवडीचे प्रमाण लक्षात घेता तेथील सर्व शेतकऱ्यांची उत्पादकता प्रगतिशील शेतकऱ्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी आणि मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजनेकरिता येत्या ३ वर्षात १ हजार कोटी रुपये निधी देण्यात येईल.
परभणीच्या वनामकृ विद्यापीठास ५० कोटीवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांना ५० वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांना संशोधनाकरिता प्रत्येकी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येईल, असे सांगितले.
उस्मानाबादेत जलसिंचन योजनाआकांक्षित जिल्ह्यासाठी जलसिंचन सुविधा पुनर्जीवित करणे अंतर्गत उस्मानाबाद, गडचिरोली आणि नंदूरबार या आकांक्षित जिल्ह्यांत वाशिम जिल्ह्याच्या धर्तीवर पाझर तलावांचे साठवण तलावात रुपांतर करुन जलसिंचन सुविधा पुनर्जीवित करण्याची योजना राबविण्यात येणार आहे.
मराठवाड्यासाठी मोबाईल प्रयोगशाळादेशी गायी, म्हशींसाठी प्रयोगशाळा अंतर्गत देशी गायी, म्हशींची उत्पादकता वाढवण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकी एक, अशा एकूण तीन मोबाईल प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहेत. उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गायी व म्हशींची स्त्रीबीजे प्रयोगशाळेत फलित करुन सर्वसाधारण गायी-म्हशींमध्ये स्त्रीभृण प्रत्यारोपणाची सुविधा किफायतशीर दरात व शेतकऱ्यांच्या दारात उपलब्ध करून देण्यात येईल.
नांदेड, जालना येथे ट्रॉमा केअर युनिटसार्वजनिक आरोग्यअंतर्गत राज्यात नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा या ठिकाणी प्रत्येकी ५० खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्यासाठी भांडवली खर्चाकरिता १०० कोटी रुपये आणि आवर्ती खर्चासाठी १८ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
हिंगोली, औरंगाबादेत १०० खाटांची स्त्री रुग्णालयेरुग्णालयांची स्थापना व श्रेणीवर्धन, महिला व नवजात शिशु रुग्णालय अंतर्गत सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला व नवजात शिशु रुग्णालयांची स्थापना करण्यात येईल. त्यानुसार हिंगोली, औरंगाबाद येथे प्रत्येकी १०० खाटांची स्त्री रुग्णालये स्थापन करण्यात येतील. बीड येथे स्त्री रुग्णालयाचे बांधकाम व श्रेणीवर्धनाचे काम हाती घेण्यात येत आहे.
जालना येथे नवीन मनोरुग्णालयनवीन मनोरुग्णालयाची स्थापना अंतर्गत जालना येथे ३६५ खाटांचे नवीन प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यात येत आहे. या रुग्णालयाच्या बांधकामासाठी अंदाजे ६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
जालना ते नांदेड द्रुतगती जोड महामार्गहिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग अंतर्गत नागपूर ते भंडारा-गोंदिया आणि नागपूर ते गडचिरोली असा विस्तारित मार्ग करण्याचे नियोजन आहे. सदर महामार्गाचे ७७ टक्के काम पूर्ण झाले असून जालना ते नांदेड या द्रुतगती जोड महामार्गाच्या भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
अहमदनगर-बीड-परळी, वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गरेल्वे विकास : अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ, वर्धा-यवतमाळ-नांदेड, या रेल्वे मार्गांची कामे विविध टप्प्यांत असून जालना-जळगाव या नवीन रेल्वे प्रकल्पांमध्ये राज्य शासनाकडून आर्थिक सहभाग देण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मुंबई-जालना-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावाबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
अजिंठा, वेरुळचा पर्यटन विकासजव्हार जि.पालघर, फर्दापूर जि.औरंगाबाद, अजिंठा, वेरुळ, महाबळेश्वर व लोणावळा येथे पर्यटन विकासाकरिता सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष कार्यक्रमासाठी ७५ कोटी रुपये जाहीर करण्यात आले.