रामेश्वर काकडे, नांदेडसप्टेंबर महिना उजाडला तरी अद्याप जिल्ह्यातील ९३० ग्रामपंचायतींनी आपल्या जमा-खर्चाचा डाटा प्रिया स्वॉफ्ट या अज्ञावलीमध्ये भरलाच नसल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन आपण केलेल्या गैरव्यवहाराचा बिगूल फुटेल या भीतीने बहुतांश ग्रामपंचायतींनी ही माहिती दडविल्याची शक्यता आहे.जिल्ह्यात एकूण १३०९ ग्रामपंचायती असून या सर्व ग्रामपंचायती इंटरनेटने महाआॅनलाईन जोडण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासाठी स्वतंत्र संग्राम कक्षामार्फत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती संगणकाद्वारे इंटरेनटने जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थांना गावातच सर्व प्रकारचे कागदपत्रे उपलब्ध होऊन त्यांचे काम सुकर होण्याचा उद्द्ेश आहे. परंतु बहुतांश ग्रामपंचायती तसेच ग्रामसेवकांच्या उदासीनतेमुळे या कामामध्ये अडथळा निर्माण होत आहे.एकूण १३०९ ग्रामपंचायतींपैकी इंटरनेटची सोय असलेल्या केवळ २५० ग्रामपंचायत स्तरावर महाआॅनलाईन जोडणी दिलेली आहे. यासाठी ८४२ आॅपरेटरची नेमणूक करण्यात आलेली आहे. एक हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीसाठी एक स्वतंत्र आॅपरेटर तर एक हजारपेक्षा कमी लोकसंख्या असेल तर तीन गावासांठी मिळून एका आॅपरेटरची नेमणूक केलेली आहे. पंचायत विभागामार्फत सर्वच ग्रामपंचायतींना संगणक पुरविण्यात आले परंतु जागेअभावी बहुतांश संगणक ग्रामसेवक किंवा सरपंचाच्या घरी ठेवण्यात आले आहेत.महाआॅनलाईनच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या प्रिया स्वॉफ्ट या अज्ञावलीमध्ये गावाची मालमत्ता, अॅसेंट डिरेक्टरी, लोकल गव्हरमेंट डिरेक्टरी, एरिया प्रोफाईल,प्लान प्लस, सर्विस प्लस, अॅक्शन स्वॉफ्ट, सोशल अॅडिट, ट्रेनिंग आणि पंचायत पोर्टल तसेच एनआयसीच्या ११ अज्ञावली यात भरल्या जातात. याशिवाय ग्रामपंचायतीने जन्म-मृत्यू असे १ ते २७ नमूने संग्राममध्ये भरले जातात. तसेच नागरी सुविधेमध्ये जन्म-मृत्यू मालमत्तेप्रमाण १९ दाखले देता येतात.याव्यतिरिक्त अपना सीएससी स्वॉफ्टवेअरमधून पॅन कार्ड, शेतकरी असल्याची नोंद, रेल्वे आरक्षण, डिस टिव्ही रिचार्ज, बस तिकीट बुकींग, मोबाईल रिचार्ज इत्यादी सेवा ग्रामपंचायतींना देता येतात. सध्या जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतींनी पुढाकार घेवून बँकेची सुविधा सुरु केली आहे. यात झीरो बॅलेंसवर खाते उघडणे, क्रेडीट डाटा यासारख्या सेवा उपलब्ध करण्यात येत आहेत. मात्र ग्रामपंचायतींच्या उदासीनतेमुळे तसेच जागेअभावी व इंटरनेट जोडणीच नसल्यामुळे शेकडो गावे महाआॅनलाईन सेवेपासून मूकत आहेत. पंचायत समितीत कॅम्प लावून जन्म नोंदणी, मृत्यू नोंदणी आणि ८ अ चा उतारा हे प्रमाणपत्र देण्याचे काम जवळपास ९५ टक्के पूर्ण झाल्याचे संग्राम कक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
९३० ग्रा.पं.चा जमाखर्च हिशेबच नाही
By admin | Published: September 07, 2014 11:54 PM