औरंगाबाद : राज्य शासनाने घेतलेल्या प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) माध्यमातून राबविण्यात येणारे अभ्यासक्रम वगळता बाकी सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशपूर्व परीक्षा न घेता गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल, तसेच पीएच.डी.साठी उपलब्ध असणाऱ्या जागा, विद्यार्थिसंख्या याचा निश्चित आढावा घेऊन पेट परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या संवैधानिक अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व नवनियुक्त संवैधानिक अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात घेण्यात आली. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. बैठकीस प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ. जयश्री राजेश सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ. भालचंद वायकर, डॉ. प्रशांत अमृतकर, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. योगेश पाटील, उस्मानाबाद उपपरिसरचे संचालक डॉ. दत्तात्रय गायकवाड आदींची उपस्थिती होती.
यावेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० या शैक्षणिक वर्षाचे नियोजन नव्याने करावे लागणार आहे. आगामी वर्षात प्रवेश प्रक्रियेपासून ते निकालापर्यंत अकॅडमिक कॅलेंडर तयार करण्यात येणार आहे.