औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी आणि मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमिन (एमआयएम) या दोन्ही पक्षांची आज पुण्यात बैठक घेण्यात आली. बैठकीस वंचिततर्फे स्वत: प्रकाश आंबेडकर, तर एमआयएमप्रमुख असदोद्दीन ओवेसी उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये बंद खोलीत तब्बल तीन तास चर्चा झाली. विधानसभेच्या कोणत्या जागा कोणाकडे राहतील यावर प्राथमिक चर्चा झाली. कोणाला किती जागा हे अद्याप निश्चित नाही. लवकरच अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
लोकसभेच्या निवडणुकीत वंचित-एमआयएम फॅक्टरला भरघोस प्रतिसाद मिळाला नाही. विधानसभा निवडणुकांमध्ये हा फार्म्युला यशस्वी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही दिवसांमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक रणनीतीमध्ये आमूलाग्र बदल केला आहे. वंचितमध्ये मागील काही दिवसांमध्ये विविध समाजाचे नेते सामील झाले आहेत. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला भरघोस यश मिळेल, यादृष्टीने आज पुण्यात वंचित बहुजन आघाडी, एमआयएमची बैठक आयोजित केली होती. प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत तब्बल तीन तास विधानसभेच्या प्रमुख जागांवर चर्चा करण्यात आली. मागील विधानसभा निवडणुकांमध्ये एमआयएमने ज्या जागा लढविल्या होत्या, त्यापेक्षा काही जास्तीच्या जागांचा आग्रह धरण्यात आला. त्यावरही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. एमआयएमचे प्रमुख असदोद्दीन ओवेसी यांनी सर्व निर्णय घेण्याचे अधिकार प्रकाश आंबेडकर यांनाच यापूर्वी सोपविले असल्याचेही सूत्रांनी नमूद केले.
काँग्रेससोबत युतीची शक्यता धूसरवंचित बहुजन आघाडीने काँग्रेससोबत यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. अलीकडेच प्रकाश आंबेडकर यांनी एका पत्रकार परिषदेत पन्नास टक्के जागांची आॅफर काँग्रेसला दिली होती. त्यावर काँग्रेसने उत्तरच दिले नाही. आता एमआयएमसोबत जागा वाटपावर चर्चाही झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम २८८ जागांवर निवडणूक लढविणार हे निश्चित.