लातूर : २ कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत लातूर जिल्ह्यात १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी ९ लाख १८ हजार ६८८ वृक्षांची लागवड करण्यात आली. यात लातूर मनपाला १० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ९ हजार २०० वृक्ष मनपाने लावले. पण लावलेली झाडे जगविण्याचा कृती आराखडा कागदावरच आहे. त्यामुळे शहरातील ठिकठिकाणचे वृक्ष पाण्याअभावी वाळून गेली आहेत. ‘कुंपनही नाही अन् पाणीही नाही...’ अशी विदारक स्थिती आहे. त्यामुळे ही झाडे वाळून गेली आहेत. शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने १ जुलै २०१६ रोजी जिल्ह्यात २ कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत ९ लाख ८ हजारांचे उद्दिष्ट होते. या उद्दिष्टापेक्षा अधिक लागवड लातूर जिल्ह्यात झाली. जवळपास ९ लाख १८ हजार ६८८ वृक्ष लावण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्ष जगविण्यासाठी कृती आराखडा सादर करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले होते. त्यानुसार कृती आराखडाही यंत्रणांनी दिला. मात्र वृक्ष जगविण्याकडे दुर्लक्ष केले. लातूर मनपाने ९ हजार २०० वृक्षांची लागवड शहरात विविध ठिकाणी केली आहे. रिंगरोड, अंबाजोगाई रोड, कव्हा नाका परिसर, अंबाजोगाई बसडेपो परिसर, स्वराजनगर, बार्शी रोड परिसर, शाहू चौक परिसर तसेच देशीकेंद्र विद्यालय परिसर व शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही वृक्ष लागवड केली. मात्र या झाडांना ‘ना कुंपन ना पाणी’ अशी स्थिती आहे. (प्रतिनिधी)
कुंपणही नाही अन् वृक्षांना पाणीही नाही !
By admin | Published: January 20, 2017 12:15 AM