औरंगाबाद : कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी तूर्तास जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येणार नाही. रुग्णसंख्या वाढली, तर सर्व समन्वयातून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येईल, असे प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. शासनाने घालून दिलेल्या नियमात शिवजयंती साजरी करावी, असे आवाहनदेखील यावेळी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर आदी उपस्थित होते.
गव्हाणे म्हणाले, काळजी घ्यावीच लागणार आहे. रुग्ण वाढले, तर कठोर निर्णय घ्यावे लागतील. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच गेल्या दोन आठवड्यांपासून शहरातही कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे. हा नवा स्ट्रेन असल्याचेही आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याचे सर्व नागरिकांना आवाहन आहे. कोरोना उपचारासाठी जिल्ह्यात ११५ उपचार सुविधा उपलब्ध असून, ९९ हजार ७६३ खाटा, ५३२ आयसीयू, ३०० व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. जिल्ह्यात लसीकरणालाही सुरुवात झाली असून, ४१.५४ टक्के लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. १६ मार्चनंतर ५० वयाच्या पुढच्या लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
५० पथकांचे गठण; १९० ठिकाणी नोटीसजिल्ह्यात तहसीलदार, नायब तहसीलदारांचे ५० पथके गठित केले असून, १९० मंगल कार्यालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. तीन दिवसांपासून रुग्ण वाढत आहेत. येत्या पाच ते सहा दिवसांत कशी परिस्थिती निर्माण होईल, त्यानुसार जिल्ह्यात सीमाबंदीचा निर्णय घेण्याबाबत विचार होईल.