औरंगाबाद : कोविड आजारावर नेमका रामबाण उपाय कुठलाही नाही. कोविड रुग्ण दाखल झाला आणि रुग्ण बरा होणार, असे १०० टक्के औषध नाही, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर म्हणाल्या.
घाटीत मंगळवारी पत्रकार परिषदेत संवाद साधताना डाॅ. येळीकर बोलत होत्या. गतवर्षी मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि उपचाराच्या दृष्टीने अनेक गोष्टी समोर आल्या. हायड्रॉक्सिनक्लोरोक्विन, टॉसिलीझुमॅब, रेमडेसिवीर इंजेक्शन, प्लाझ्मा थेरपी असे अनेक औषधोपचार कोरोना रुग्णांवर वापरण्यास सुरुवात झाली. जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. गेली ३ महिने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता; परंतु आता पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज होत आहे. डाॅ. येळीकर म्हणाल्या, कोरोनावर नेमका रामबाण उपाय नसून, उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक गोष्टी म्हणजे मास्क, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्स या गोष्टींमुळे कोरोनापासून बचाव होऊ शकतो.
रुग्ण लवकर आला तर रेमडेसिवीररेमडेसिवीरचा कोरोनाबाधितांवरील उपचारात फारच कमी प्रभाव दिसून आल्याचे काही महिन्यांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते. रेमडेसिवीरसंदर्भात घाटी प्रशासनास अद्यापही कोणत्या सूचना आलेल्या नाहीत. रुग्णांना त्याचा फायदा होत असल्याने ते वापरले जात आहे. रुग्ण उपचारासाठी लवकर आला तर रेमडेसिवीर दिले जाते. तिसऱ्या स्टेजपर्यंत रुग्ण आला तर फायदा होतो; पण त्यानंतरच्या स्टेजवर आलेल्या रुग्णांना फायदा होत नसल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.