---
२८१ गावांतील नळयोजना कालबाह्य : जिल्ह्यात १५४२ शाळा, १९० अंगणवाड्यांना नळजोडणीची प्रतीक्षा
---
औरंगाबाद : जिल्ह्यात १२८ गावांमध्ये नळ योजना नाही. तसेच २८१ गावांतील नळयोजना कालबाह्य झालेल्या आहेत, तर १५४२ शाळा आणि १९० अंगणवाड्यांना अद्याप नळ कनेक्शन मिळालेले नाही. निधीअभावी रखडलेली ही कामे मार्गी लावण्यासाठी जलजीवन मिशनच्या कृती आराखड्यात मंजूर ४३० कोटींचा निधी मिळण्याकडे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांनी नुकतीच पाणी पुरवठ्याची बैठक घेतली. गावागावात पाणी पोहोचावे, यासाठी शासनाकडून अनेक पाणी योजना राबविल्या जातात. मात्र, औरंगाबाद तालुक्यातील अनेक गावांना शासनाच्या या पाणी पुरवठा योजनांची माहिती नसल्याची बाब समोर आली आहे. यातच जलजीवन मिशन ही अभिनव योजनादेखील अनेक गावांत पोहोचलेली नाही. यासंदर्भात आयोजित बैठकीस तालुक्यातील सर्व सरपंच, गटविकास अधिकारी, सर्व ग्रामसेवक तसेच सर्व खात्यांचे विभागप्रमुख यांची उपस्थिती होती. अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनची माहिती ग्रामस्थांना तसेच गावगाडा चालविणाऱ्या पदाधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचलेली नाही. या योजनेंतर्गत प्रत्येक घराला ५५ लिटर पाणी मिळण्याची तरतूद आहे. मात्र, योजनेची माहितीच गावात पोहोचलेली नसल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके यांनी सर्वांची चांगलीच कानउघाडणी केली.