- संतोष हिरेमठ।औरंगाबाद : कोरोनाच्या संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, कोरोना बाधित व संशयित रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेले पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई) किटचा साठा घाटी रुग्णालयात शून्य आहे, तर जिल्हा रुग्णालयात अवघे १३ दिवस पुरतील इतक्या म्हणजे ६५ किट उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य यंत्रणा हादरून गेली होती. हा रुग्ण निगेटिव्ह झाला, रुग्णालयातून सुटीही झाली; परंतु दररोज आढळून येणाºया संशयितांची संख्या वाढत आहे. रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वपूर्ण साधने डॉक्टर, कर्मचाºयांना उपलब्ध होत नसल्याची धक्कादायक परिस्थिती आहे. यात प्रामुख्याने डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाºयांना आवश्यक पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट अर्थात पीपीई किट पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी मास्कसह पर्सनल प्रोटेक्शन इक्वि पमेंट लागतात. हे ‘पीपीई’ पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, असा आरोग्य विभागाकडून दावा केला जात आहे. ज्या ठिकाणी सर्वाधिक रुग्ण येत आहेत, त्या जिल्हा रुग्णालयात केवळ ६५ ‘पीपीई’ असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. तर घाटीत एकही ‘पीपीई’ किट उपलब्ध नाही. डॉक्टरांना दोन महिन्यांपासून त्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
काय आहे ‘पीपीई’?
कोरोना संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णाच्या निदान, उपचारात ‘पीपीई’ किट महत्त्वाचे ठरते. यात दोन एकावर एक असे दोन विशेष गणवेश, चष्मा, हातमोजे, पायासाठी मोजे, मास्क आदींचा समावेश असतो. स्वॅब घेताना, उपचार करताना रुग्ण शिंकतात, खोकलतात, तेव्हा या किटमुळे संरक्षण होते.
कोरोनासाठी घाटीत एचआयव्ही किटचा वापर
कोरोनाच्या विळख्यात घाटीत ‘पीपीई’ नसल्याने एचआयव्ही किटचा वापर करण्याची वेळ डॉक्टरांवर ओढवत आहे. दोन महिन्यांपासून ‘पीपीई’ची नुसती वाट पाहावी लागत आहे.जिल्हा रुग्णालयास ३०० ‘पीपीई’ मिळणार आहेत. सध्या असलेले ६५ ‘पीपीई’ पुढील १३ दिवस पुरतील. तोपर्यंत नवीनही येतील.- डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक
घाटी रुग्णालयासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडे ३५० ‘पीपीई’ची मागणी केली आहे. सध्या २८ एन-९५ मास्क उपलब्ध आहेत.- डॉ. सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी