‘वंचित बहुजन आघाडी’ची माफी मागण्याचा प्रश्नच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 01:03 PM2019-08-06T13:03:03+5:302019-08-06T13:08:15+5:30

राज ठाकरे यांच्याजवळ जाण्या-येण्याचाही प्रश्न नाही

There is no question of apologizing for 'Vanchit Bahujan Aaghadi' | ‘वंचित बहुजन आघाडी’ची माफी मागण्याचा प्रश्नच नाही

‘वंचित बहुजन आघाडी’ची माफी मागण्याचा प्रश्नच नाही

googlenewsNext
ठळक मुद्देथोरात, चव्हाण यांची स्पष्टोक्ती  ईव्हीएम नको  या मताचे पक्ष येत्या २१ आॅगस्ट रोजी मुंबईत मोर्चा काढणार

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीशी आम्ही संपर्कात आहेत. आता निर्णय वंचित बहुजन आघाडीने घ्यायचा आहे. वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हटले म्हणून काँग्रेसने माफी मागण्याचा प्रश्नच नाही.  लोकसभा निवडणुकीत ते प्रतिस्पर्धी म्हणून आमच्यासमोर उभे ठाकल्यानंतर आरोप-प्रत्यारोप तर होणारच आणि त्यांच्यामुळे काँग्रेसचे  नुकसान झाले, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी केले.

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बाबूराव कुलकर्णी यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यास मार्गदर्शन केल्यानंतर नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व अशोकराव चव्हाण यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. ईव्हीएम नको  या मताचे पक्ष येत्या २१ आॅगस्ट रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे काँग्रेसच्या जवळ येत आहेत, असे वगैरे काही नाही. त्यांच्याशी यासंदर्भात कसली बोलणीही झालेली नाही, असे यावेळी बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. 

...तर अनेक राज्ये बरखास्त होतील! 
३७० कलम हटविण्यासंदर्भात बाळासाहेब व अशोकरावांचे म्हणणे पडले की, हे लोकशाहीला घातक असून अशाने अनेक राज्ये उद्या बरखास्त होतील. महाराष्ट्राचेही तुकडे पडतील. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असे म्हणणारे मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणात कपात करण्याचा अध्यादेश काढीत आहेत, असे चव्हाण म्हणाले. प्रांताध्यक्षांनी आदेश दिल्यास मी विधानसभा निवडणूकही लढायला तयार असल्याचे हसत हसत चव्हाण यांनी नमूद केले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपात काही अडचणी नाहीत; पण इंदापूरची जागा काँग्रेसला हवीय, असे एका प्रश्नाच्या उत्तरात थोरात यांनी सांगितले. 

मागच्या वेळी पंचांगात योग नव्हता...
बाबूराव कुलकर्णी यांच्या प्रचारार्थ झालेल्या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.प. सदस्य, मनपा नगरसेवक, नगरपालिकेचे नगरसेवक आदी उपस्थित होते. यावेळी स्वत: बाबूराव कुलकर्णी यांनी, सध्या श्रावण महिना सुरू असल्यामुळे ब्राह्मणाला दान द्या आणि निवडून आणा, असे आवाहन केले. त्यानंतर राष्ट्रवादीचे कदीर मौलाना यांचे भाषण झाले. ‘बाबूराव उधर के ब्राह्मण है, तो मैं भी मौलाना इधर का ब्राह्मण हू’ असे उद्गार काढून हास्याचे कारंजे उडवले.बाळासाहेब थोरात व अशोकराव चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले व कुलकर्णी यांना निवडून आणणे हे  कसे आवश्यक झाले आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. मागच्या वेळेच बाबूराव कुलकर्णी यांना तिकीट द्यायचे होते; पण त्यावेळी त्यांच्या पंचांगात योग नव्हता. आता योग आहे, असे बाळासाहेब उद्गारले.

‘...तर एक लाख तरुण बेरोजगार होतील’
राज्य शासनाच्या धोरणामुळे सध्या औरंगाबादेतील आॅटोमोबाईल इंडस्ट्री बंद पडत आहे. त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण होईल. किमान ५० हजार ते एक लाख तरुण बेरोजगार होतील, असा धोका माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, औरंगाबादची किंबहुना मराठवाड्याची इकॉनॉमी या आॅटोमोबाईल इंडस्ट्रीवर अवलंबून आहे; पण तीच आता बंद पडत आहे. टाटा मोटार्स कंपनीने ले आॅफ द्यायला सुरुवात केलेली आहे. राज्य सरकारचे मराठवाड्याकडे मुळीच लक्ष नाही. यांना फक्त प्रचारयात्रा दिसताहेत. मराठवाड्याचा विकास दिसत नाही. मराठवाड्यात अद्यापही पाऊस समाधानकारक नाही. कुठे कुठे तरी पाऊस नाही म्हणून दुबार पेरण्या कराव्या लागत आहेत. सरकारच्या कर्जमुक्तीची घोषणा नुसती घोषणाच राहिलेली आहे. शेतकºयांच्या आत्महत्या थांबत नाहीत. हे सरकारला दिसत नाही, अशी टीकाही चव्हाण यांनी केली. 

उत्तमसिंग पवार काँग्रेसमध्ये
मागील काही वर्षांपासून उत्तमसिंग पवार हे राजकीय अज्ञातवासात होते. आज त्यांनी हा अज्ञातवास संपवत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ‘मी काँग्रेसमध्येच होतो; पण आता  अधिक सक्रिय होईल,’ असे प्रवेशानंतर सांगितले. थोरात व चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी सूत्रसंचालन केले. मंचावर आमदार सुभाष झांबड, जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अनिल पटेल, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शहराध्यक्ष विजय साळवे, माजी आमदार एम.एम. शेख, रंगनाथनाना काळे, कल्याण काळे, अशोक सायन्ना, अभिषेक देशमुख, राजेश पवार, सूरजितसिंग खुंगर, नगरसेवक अफसर खान आदींची उपस्थिती होती.

Web Title: There is no question of apologizing for 'Vanchit Bahujan Aaghadi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.