स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेस स्वबळावरच लढते; शिवसेना, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा प्रश्नच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 07:10 PM2020-10-16T19:10:16+5:302020-10-16T19:11:31+5:30
कॉंग्रेसचे नेते अम्मित देशमुख यांचे स्पष्टीकरण
औरंगाबाद : काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नेहमी स्वबळावरच लढते. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकादेखील काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे, अशी जाहीर भूमिका वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्हा संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मांडली.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पक्ष राज्यात महाविकास आघाडींतर्गत सत्तेत आहेत. मग तीच आघाडी महापालिकेच्या निवडणुकीत कायम न राहण्यामागे नेमके कारण काय, असे विचारता देशमुख म्हणाले. ठोस असे कारण नाही. मात्र, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मागणी स्वबळावर निवडणूक लढण्याची आहे. एमआयएमसारख्या पक्षाविषयी आगामी काळात धोरण ठरविले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. संपर्कमंत्री म्हणून तुम्ही भेटत नाहीत, अशी नाराजी कार्यकर्ते व्यक्त करतात, असे निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले, यापुढे मी नियमित येतच राहणार आहे. पदवीधर निवडणुकीबाबतचा निर्णय काँग्रेस प्रदेश कमिटी घेईल, असे ते म्हणाले. माजी आ. कल्याण काळे, नामदेव पवार, जितेंद्र देहाडे यांची यावेळी उपस्थिती होती.
सांस्कृतिक कार्यक्रमांबाबत सकारात्मक
सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मिळावी, ही आग्रहाची मागणी होतेय. मनोरंजन क्षेत्रातूनही मागणी आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून विचार सुरू आहे. याबाबत लवकरच दिलासादायक निर्णय होईल, असे सूचक विधानही देशमुख यांनी केले.