हिंगोली : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे टंचाईत नियमांचा अतिरेक न करता प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांनी तात्काळ टँकरची व्यवस्था करावी, असा आदेश पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी येथे आयोजित बैठकीत दिला.खा. राजीव सातव, आ.रामराव वडकुते, आ.तान्हाजी मुटकुळे, आ.डॉ.संतोष टारफे, जिल्हाधिकारी तुकाराम कासार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, ए.एम. देशमुख, बी. पी. लोंढे, खुदाबक्ष तडवी, लतिफ पठाण, किशोर मास्ट, पी.पी. शेळके आदी उपस्थित होते.एप्रिल-मेमध्ये टंचाई गंभीर होणार आहे. त्यामुळे या काळात परिणामकारक अंमलबजावणी व्हावी. प्रशासन जनतेच्या पाठीही आहे, याची जाणीव त्यांना झाली पाहिजे. सेनगाव तालुक्यातील हत्ता येथे सोमवारपासून चारा छावणी सुरू करण्याची सूचनाही त्यांनी दिली. तर ग्रा.पं.चा टँकरचा प्रस्ताव आल्यानंतर पाच दिवसांत तेथे उपाययोजना झाली पाहिजे. दुष्काळात रोहयोची कामे मोठ्या प्रमाणात सुरू व्हावीत. कामे सुरू केली जात नसल्याची तक्रार आल्यास थेट अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू. मात्र कामे सुरू केल्यावर तक्रारी झाल्यास कारवाई होणार नाही, असे स्पष्ट केले. शेततळे व सिंचन विहिरी झाल्यास भविष्यात दुष्काळ राहणार नाही. नरेगात ही कामे व्हावी. यापुढे दर पंधरा दिवसांनी आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी म्हणाले, टंचाईत ३९ विहिरी मंजूर केल्या. त्यापैकी २४ ला पाणी लागले आहे. तर जलयुक्तमध्ये २७३८ पैकी २0१६ कामे पूर्ण झाली. ६८५ कामे शिल्लक असून ३७ प्रगतीपथावर आहेत. आतापर्यंत ३४ कोटी ६१ लाखांचा खर्च झाला आहे. खासदार-आमदारांनीही विविध कामांबाबत सूचना देत सुधारणेची अपेक्षा व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)लोकप्रतिनिधींनी कामांना भेटी द्याव्यातजलयुक्त शिवार योजनेतील कामे दर्जेदार होणे अपेक्षित आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी या कामांना सातत्याने भेटी दिल्या पाहिजेत. शेतकऱ्यांसाठीची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे, असे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर यात यावर्षी २६ कोटी मंजूर असून ७ कोटी मिळाले. उर्वरित मार्च एण्डपर्यंत मिळतील, असेही स्पष्ट केले. ग्रामीण भागातील यात्रौत्सवात तमाशा मंडळांना गावाची मागणी व शांततेत पार पडण्याची हमी असल्यास परवानगी देण्यास सांगितले. यानंतर विकासकामे व कायदा व सुव्यस्थेसाठी गावपातळीवर बैठका घेण्यात येतील, असेही ते म्हणाले. तर जलेश्वर व चिरागशहा तलावातील गाळ काढण्याचे काम सोमवारपासून सुरू करण्याचा आदेश प्रशासनाला दिला. तालुका क्रीडा संकुलाच्या मुद्यावर आ.तान्हाजी मुटकुळे हे आक्रमक होत असताना जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी मात्र जिल्ह्यातील रिक्त पदांमुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याचे सांगून त्यासाठी आधी प्रयत्न करा, असे सांगितले. प्रश्न कोणताही असो पालकमंत्री त्यावर सोमवारपासून अंमलबजावणी होईल, हे उत्तर देत होते. त्यामुळे यापूर्वीच्या कामांचा दाखला पत्रकारांनी दिल्यानंतर हास्यविनोद झाला. एकप्रकारे पालकमंत्र्यांनाही आपला आश्वासनांवरच जास्त भर असल्याचे लक्षात आले असावे.टंचाईचा काळ असताना प्रशासनात समन्वय नसल्याचा आरोप बैठकीनंतर खा. राजीव सातव यांनी केला. त्यामुळे आज टंचाईवर बैठक असताना तीन तालुक्यांचे गटविकास अधिकारीच आले नाहीत. ते पुढे कसे गांभिर्याने कामे करतील. तर रोहयोची कामेही काही ठरावीक भागात होत आहेत. काही ठिकाणी ती सुरू करण्यास टाळाटाळ दिसते. यात प्रामुख्याने विहिरींची कामे झाली पाहिजे. तर जलयुक्त शिवार योजनेत ठराविक टप्प्यांतच कामे होत आहेत. या योजनेचा चांगला फायदा होण्यासाठी माथा ते पायथा हा नियम असूनही तो पायदळी तुडवत आहेत.कळमनुरी तालुक्यात प्रामुख्याने रोजगार हमी योजनेची कामे करण्याची गरज आहे. या तालुक्यात नगण्या कामे सुरू आहेत, असे खा. सातव म्हणाले. त्याला दुजोरा देत आ.वडकुते यांनीही वसमतलाही दुष्काळ आहे तर कामे का सुरू होत नाहीत, असा सवाल केला.
टंचाईत नियमांचा अतिरेक नको
By admin | Published: March 13, 2016 2:23 PM