औरंगाबाद : महिन्यापूर्वी कोरोनामुक्त झालेल्या आणि पुढे कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावांत दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात पडताळणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले. यासंदर्भात जिल्ह्यात १०२८ गावे कोरोनामुक्तीच्या वाटेवर असून ५२६ गावांत २८ दिवसांपासून एकही बाधित आढळून आलेला नाही. तरीही या गावांत दहावी-बारावीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भातील पडताळणीच्या सूचना राज्य शासनाकडून नसल्याने प्रत्यक्ष वर्गात शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने जिल्हा पातळी १ मध्ये आल्याने सर्व निर्बंध हटले. त्यामुळे गेल्या वर्षी नववीत काही काळ प्रत्यक्ष वर्गात शिकलेल्या विद्यार्थ्यांना पुढे पुन्हा वर्गात बसून शिकण्याची इच्छा आहे. दोन शैक्षणिक वर्षांत वर्गोन्नत झालेल्या या विद्यार्थ्यांना आता दहावीच्या वर्गांच्या सुरुवातीकडे लक्ष लागले आहे. मात्र, जिल्ह्यात अद्याप २८१ गावांत कोरोनाचे संक्रमण हटलेले नाही. ५२६ गावांतील संक्रमण २८ दिवसांपूर्वी संपले तर २०४ गावांच्या वेशीवर कोराेनाला थोपविण्यात यश आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर दहावी, बारावीचे वर्ग कधी भरतात याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. अद्याप शहरात प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यासंदर्भात सूचना नसल्याने सध्यातरी शिक्षण ऑनलाइनच असणार आहे, असे महापालिकेचे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी सांगितले.
चौकट...
अद्याप आदेश नाही
दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी अद्याप राज्य शासनाकडून किंवा शिक्षण विभागाकडून सूचना मिळालेल्या नाहीत. वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आल्यावर त्यानुसार पडताळणी करून वर्ग सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.