मुंबई - ब्रिटन आणि इतर देशांमध्ये करोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या नव्या व्हायरसचा धोका असतानाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनचा महाराष्ट्रात एकही रुग्ण नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, राज्यातील सर्वच जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात ब्रिटनहून नागरिक आल्याचे वृत्त अनेक माध्यमांत झळकले होते. त्यापैकी, काहीजण कोरोना पॉझिटीव्हही आढळून आले होते. त्यामुळे, अनेकांचे लक्ष्य आरोग्यविभागाच्या माहितीकडे लागून राहिले होते.
ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगभरात कहर केला असतानाच आता भारतातही नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर येत आले. ब्रिटनमधून भारतात परतलेल्या ६ जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. एकीकडे नव्या वर्षाच्या स्वागताची सर्वत्र उत्सुकता लागलेली असताना कोरोनाच्या नव्या प्रकाराचा भारतात झालेला शिरकाव चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. केंद्र सरकारने आज (मंगळवारी) दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमधून परतलेल्या ६ जणांमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाली आहे. यामध्ये तीन नमुने बेंगळुरू, दोन नमुने हैदराबाद आणि एक नमुना पुण्यातील प्रयोगशाळेतील असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले. मात्र, महाराष्ट्रातही नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातही गेल्या महिन्याभरात ब्रिटनहून परतलेल्या प्रवाशांची संख्यादेखील अधिक होती. त्यामुळं आरोग्य प्रशासनानदेखील सावध झालं होतं. मात्र, 'ब्रिटनमधून आत्तापर्यंत महाराष्ट्रात आलेल्या 43 प्रवाशांमध्ये करोनाचा एकही नव्या करोना स्ट्रेनचा पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याचं टोपे यांनी म्हटलं. तसंच, नागरिकांनी घाबरण्याचं कारणं नाही, पण काळजी घेणं आवश्यक आहे,' असं आवाहनही त्यांनी केलंय.
देशभरातील प्रयोगशाळांमध्ये तपासणी सुरू
दुसरीकडे आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत ब्रिटनहून सुमारे ३३ हजार प्रवासी भारतात आले असून, सर्वांची तपासणी करण्यात आली. यातील ११४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर देशभरातील सुमारे १० प्रयोगशाळांमध्ये हे नमुने पाठवण्यात आले असून, यात कोलकाता, भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीसीएफडी हैदराबाद, इन्स्टेम बंगळुरू, एनआयएमएचएएनएस बंगळुरू, आयजीआयबी दिल्ली आणि एनसीडीसी दिल्ली या प्रयोगशाळांचा समावेश आहे.