(सिटी गेस्ट )
स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत मराठवाड्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाचे एकही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले नाही. यामुळे येथील लोकांना हृदयशस्त्रक्रियेसाठी किंवा अन्य मोठ्या उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये जावे लागते. हॉस्पिटल सोडा, पण आदिवासी भागात अनेक गावे अशी आहेत की, तिथे साधे प्राथमिक आरोग्य केंद्रही नाही. जिथे आरोग्य केंद्र आहे, तिथे तज्ज्ञ डॉक्टर, नर्स नाहीत. आरोग्य विभागात अपुरे मनुष्यबळ हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक सरकारे आली. पण मराठवाड्यातील आरोग्याचा अनुशेष काही भरून निघाला नाही.
मराठवाड्यात औरंगाबादमधील वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) अंतर्गत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू आहे. तसेच लातूर येथेही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. पण, ते अजून कार्यान्वित नाही. वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत रुग्णालय असतात. त्यात काही वैद्यकीय विभाग वाढवून सुपर स्पेशालिटी केले जाते. तिथे शिकावू डॉक्टर रुग्णांवर प्रॅक्टिस करतात. मात्र, मराठवाड्याला नाशिकप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागाचे स्वतंत्र सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची आवश्यकता आहे. जिथे मध्यमवर्गीय, गरीब रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरमार्फत उपचार, शस्त्रक्रिया केले जाऊ शकतात. या मागणीकडे आजपर्यंत कोणत्याच सरकारने गांभीर्याने विचार केला नाही.
डॉ. बेलखोडे यांनी सांगितले की, मराठवाड्यात विशेषत: बीड, नांदेडसह अन्य इतर जिल्ह्यांतून स्थलांतराचे प्रमाण खूप मोठे आहे. ऊसतोड तसेच अन्य कामांमुळे सतत शेकडो कुटुंबे स्थलांतर करीत असतात. या कुटुंबातील महिला व मुलांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या आहेत. मासिक पाळी दरम्यान रोजंदारी बुडू नये म्हणून अनेक महिलांची गर्भपिशवी काढून घेण्यात आली आहे. या शिवाय भयानक काय असू शकते. याचीही कोणीच दखल घेत नाही.
गरीबांनाही आधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राबविली जाते. मात्र, या योजनेसाठी अनेक अटी, नियम ठेवण्यात आले आहेत. यामुळे अनेकांना त्याचा उपयोग होत नाही. आरोग्य योजनेत सर्वसामान्य आजारांचा समावेश करावा, ही मागणी आहे. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष केले जाते.
मराठवाड्यात २५ टक्के लहानमुले बीसीसी लसीपासून वंचित आहेत. कारण, आरोग्य केंद्रांतील नवीन नर्सला लस कशी व कुठे द्यावी, याचे प्रशिक्षण नाही. जिथे आरोग्य केंद्र आहे तिथे वीज बिल न भरल्याने लाईट कट केलेली आहे. बर्फ वितळल्यावर तिथे ठेवलेल्या लसींमध्ये गुणवत्ता राहत नाही, अशी मराठवाड्यातील आरोग्य यंत्रणेची गंभीर परिस्थिती आहे.