जायकवाडी ( औरंगाबाद ) : 'माझ्या आयुष्यात खूप त्रास आहे, जो मी कोणाला सांगू शकत नाही. माझी एक इच्छा आहे, माझ्या मृत्यूला कोणाला जबाबदार धरू नये.' अशी फेसबुकवर सुसाईड नोट पोस्ट शेअर करत पैठण येथील अखिल भारतीय छावा संघटनेच्या युवा तालुका अध्यक्षाने एसटी बससमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री नेवासा-नगर महामार्गावरील कांगोणी फाटयाजवळ घडली. महेश पाटील शिंदे (२३, रा. अमरापूर वाघूडी, ता.पैठण ) असे आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. ( Young taluka president of Chhawa commits suicide by posting suicide note on Facebook)
गेल्या काही दिवसांपासून महेश हा तणावात होता. मात्र, तणावामागील कारण त्याने कुणालाही सांगितले नाही. मंगळवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याने फेसबुकवर,
'आयुष्य खूप छान आहे. पण त्याचे जवळचे लॉक सोबत असतील तर, माझही आयुष्य खूप संदर होत...पण मला कदाचित जगता आल नाही...खूप प्रेमाचे लॉक भेटले...माझे मित्र तर एवढे न की..कोणाचा जीव घेतील मी म्हणालो तर ...पण असो, माझ्या आयुष्यात खूप त्रास आहे, जो मी कोणाला सांगू शकत नाही. माझी एक इच्छा आहे, माझ्या मृत्यूला कोणाला जबाबदार धरू नये. मी माझ्या त्रासामुळे मरतोय. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या माझ्या जिवलगांना खूप खूप धन्यवाद. thank u so much all.'
,अशी सुसाईड नोट पोस्ट शेअर केली. त्यानंतर काही वेळातच त्याने अहमदनगर-नेवासा मार्गावरील कांगोणी फाट्याजवळ दुचाकी बाजूला उभी करून भरधाव जाणाऱ्या एसटी बससमोर उडी घेतली.
गंभीर जखमी होऊन अतिरक्तस्त्राव झाल्याने महेशची प्रकृती चिंताजनक होती. नागरिकांनी त्याला तातडीने नेवासा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच छावाचे जिल्हा अध्यक्ष किशोर शिरवत, किरण काळे, नातेवाईक संजय शिंदे आदींनी रुग्णालयाकडे धाव घेतली. बुधवारी दुपारी अमरापूर वाघूंडी येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
कॉल, कमेंटच्या माध्यमातून केली विनवणीमहेशच्या फेसबुक पोस्टनंतर मित्र, नातेवाईकांनी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला. पोस्टवर कमेंट करून टोकाचे पाऊल उचलू नकोस अशी विनवणी केली. मात्र, त्याने आत्महत्येपूर्वी मोबाईल बंद करून ठेवला होता.