छत्रपती संभाजीनगर : पडेगाव भागातील कासंबरी दर्गा परिसरात चिमुकले बहीण-भाऊ खेळत होते. तेवढ्यात अचानकपणे ओढ्याला आलेल्या लोंढ्यात बहीण वाहून गेली. त्यातच तिचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. आलिया मेहबूब पठाण (वय ७) असे मृत मुलीचे नाव आहे. दरम्यान, जि. प.च्या मैदानाजवळच्या नाल्यातही एक मृतदेह आढळला आहे.
रविवारी सायंकाळी जोरदार पावसानंतर आलिया लहान भावासोबत घराच्या परिसरातील छोट्या ओढ्यामध्ये खेळत होती. तेव्हा अचानक ओढ्याला लोंढा आला. भावाच्या हातातील बहिणीचा हात निसटला आणि बहीण लोंढ्यासोबत वाहून गेली. भावाने आरडाओरड केली, पण तोपर्यंत बहीण दूरपर्यंत वाहून गेली होती. छावणी पोलिसांना माहिती देण्यात आली. उपनिरीक्षक रावसाहेब जोंधळे, सहायक फौजदार दळवी, हवालदार हिवाळे, सुमेध पवार, निवृत्ती तांबे, योगेश राऊत, लोंढे आदींनी मुलीचा शोध सुरू केला. त्यांच्या सोबतीला परिसरातील नागरिकही होते. तेव्हा मुलगी काचपूल येथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिला पोलिसांच्या पीटर मोबाईलमध्ये नातेवाइकांसोबत घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
अनोळखी मृतदेह आला वाहूनजि. प.च्या मैदानावरील गणपती विसर्जनाच्या विहिरीजवळ असलेल्या नाल्यात एक मृतदेह असल्याची माहिती क्रांती चौक पोलिसांनी मिळाली. त्यांनी अग्निशमन विभागाला कळविले. नाल्यामधील मृतदेह अग्निशमन विभागाच्या पथकाने बाहेर काढला. त्यानंतर तो घाटीत पाठविण्यात आला. याविषयी निरीक्षक संतोष पाटील म्हणाले, काही दिवसांपूर्वीच या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला असावा. शव पाण्यासोबत वाहत आले आहे. घाटीत शवविच्छेदनानंतर मृत्यू कशामुळे झाला ते समजेल, असे त्यांनी सांगितले.