औरंगाबाद : औरंगाबादेत झालेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेच्या माध्यमातून शहरात एकाच वेळी २०० विदेशी पाहुणे आले होते. या पाहुण्यांशी शहरातील पर्यटनासंबंधी चर्चा करण्यासाठी स्थानिक सहल आयोजकांनाही आमंत्रित करण्यात आले होते; पण वेळ आणि नियोजनाच्या अभावामुळे कोणतीही चर्चा न होताच विदेशी पर्यटक नुसतेच आले आणि गेले. यामुळे पर्यटन क्षेत्रातील एक मोठी संधी हातातून निसटल्याची खंत शहरातील सहल आयोजकांनी व्यक्त केली.
देशातील बौद्ध सर्किटमध्ये औरंगाबादला जोडून शहराचा बौद्ध पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचे मागच्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे पर्यटन खात्याच्या सहकार्याने आयोजित या परिषदेच्या माध्यमातून अनेक वर्षांच्या प्रयत्नांना मूर्त रूप मिळेल, अशी अपेक्षा सहल आयोजकांसोबतच शहरातील पर्यटनप्रेमींनाही होती. जागतिक स्तरावरून मोठ्या प्रमाणावर पर्यटक शहरात येणे, हेदेखील पहिल्यांदाच होत होते.
या पर्यटकांमध्ये विविध देशांचे मंत्री, सचिव, भन्ते, पत्रकार, बौद्ध अभ्यागत आणि पर्यटक अशा सर्वांचाच समावेश होता. दि. २४ आॅगस्ट रोजी विमानतळावर आगमन झाल्यानंतर हे पर्यटक अजिंठा लेणीकडे रवाना झाले. लेणी परिसरात पोहोचायला त्यांना दु. २ वाजले. दोन तासात लेणी पाहिल्यानंतर पर्यटक पुन्हा औरंगाबादकडे रवाना झाले. दिवसभर अजिंठा लेणी पाहिल्यानंतर सायंकाळी शहरातील पर्यटनाच्या सुविधांसंदर्भात स्थानिक सहल आयोजकांशी चर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार होता; पण पर्यटकांना तसेच पर्यटनमंत्र्यांना येण्यास उशीर झाल्यामुळे ना धड सांस्कृतिक कार्यक्रम पाहता आला ना सहल आयोजकांशी चर्चा करण्यात आली.
सगळ्या अपेक्षा फोल ठरल्याच्या कार्यक्रमात जर स्थानिक सहल आयोजक आणि परदेशी पाहुणे यांना चर्चा करण्यास वेळ मिळाला असता, तर आपल्या शहरात पर्यटनाच्या उत्तमोत्तम सुविधा उपलब्ध आहेत, हे आम्हाला त्यांना उत्तम प्रकारे पटवून देता आले असते. तसेच त्यांच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा जाणून घेण्याचीही संधी मिळाली असती आणि त्यादृष्टीने आपल्याकडे सुधारणा करता येऊ शकत होत्या. आपल्याकडच्या सोयी-सुविधा जाणून परदेशी पाहुण्यांनीही लवकरच पुन्हा येथे येण्यास पुढाकार घेतला असता; पण नियोजनाअभावी सगळ्या अपेक्षा फोल ठरल्या असून एक चांगली संधी हातातून निसटली, अशी खंत सहल आयोजकांनी व्यक्त केली.
लेणी पाहायला कमी वेळ मिळालादिवसभराचे वेळापत्रक अत्यंत धावपळीचे असल्यामुळे लेणी परिसरात खूप कमी वेळ थांबता आले. अजिंठा लेणी पाहायला आणखी थोडा निवांत वेळ मिळायला हवा होता, अशी खंत काही परदेशी पाहुण्यांनी सायंकाळच्या कार्यक्रमात व्यक्त केल्याचेही समजते.