वाळूज महानगर : वाढती ग्राहकांची संख्या लक्षात घेवून भविष्यात वीजपुरवठा करताना अडचणी येऊ नये म्हणून महावितरणच्या सिडको उपकेंद्राकडून तीसगाव येथे नवीन उपकेंद्र सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, तीसगाव ग्रामपंचायतीकडे जागेची मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीनेही जागा देण्यास तयारी दर्शविल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.
सिडको वाळूज महानगर येथील महावितरण उपकेंद्रात ५ मेगा व्हॅट अॅम्पिअर क्षमतेचे २ रोहित्र (ट्रान्सफार्मर) आहेत. या उपकेंद्रातून जवळपास २० हजार ग्राहकांपर्यंत वीजपुरवठा करणे शक्य आहे.
त्यापेक्षा अधिक ग्राहकांना वीजपुरवठ केल्यास रोहित्रावर अधिकचा भार येतो. आज घडीला या उपकेंद्रातील २ रोहित्रांवरुनच सिडकोसह तीसगाव, वडगाव कोल्हाटी, वळदगाव, गोलवाडी, पंढरपूरचा काही भाग तसेच वडगाव येथील औद्योगिक क्षेत्रातील १५ हजारांपेक्षा अधिक ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. या भागात नागरी वसाहतीसह औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे.
त्यामुळे भविष्यात या उपकेंद्रातून सर्व ग्राहकांना वीजपुरवठा करणे कठीण होणार आहे. त्यामुळे सिडको उपकेंद्रातर्फे आत्तापासूनच तीसगाव हद्दीत ५ एमव्हीए क्षमतेचे नवीन वीजउपकेंद्र सुरु करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. यासाठी औरंगाबाद येथील महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच उपकेंद्रासाठी ग्रामपंचायतीनेही जागा देण्यास तयारी दर्शविली आहे. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडून प्रस्तावाला मंजुरी मिळताच ५ एमव्हीए क्षमतेच्या उपकेंद्राच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. या विषयी तीसगावचे सरपंच कौशल्याबाई रामचंद्र कसुरे म्हणाल्या की, महावितरणने वीज उपकेंद्रासाठी जागा मागितली आहे. यावर ग्रामपंचायतीच्या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल.दीड कोटीतून होणार नवीन वीज उपकेंद्र
महावितरणकडून दीड कोटी रुपये खर्च करुन तीसगाव येथे नवीन वीज उपकेंद्र सुरु केले जाणार आहे. या ठिकाणी ५ एमव्हीए क्षमतेचे एक रोहित्र (ट्रान्सफार्मर) तसेच ३ फिडर बसविले जाणार आहेत.
यापैकी दोन फिडर औद्योगिक क्षेत्रासाठी तर नागरी वसाहतीसाठी राहणार आहे. वडगाव गट नंबर ६७ व ६८ मधील उद्योजक, खडी यंत्र तसेच नवीन ग्राहकांना येथून वीजपुरवठा केला जाईल, असे महावितरणचे सहाय्यक अभियंता सचिन उकंडे यांनी सांगितले.