औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी सात जणांनी १ आॅगस्ट रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील एकाचा अर्ज बाद झाला, तर उर्वरित सहापैकी तिघांनी सोमवारी (५ आॅगस्टला) उमेदवारी मागे घेतली. महायुतीकडून अंबादास दानवे, आघाडीचे बाबूराव ऊर्फ भवानीदास कुलकर्णी, शहानवाज अब्दुल रहेमान खान यांच्यात लढत होणार आहे. नंदकिशोर सहारे, अब्दुल जावेद अब्दुल वाहेद शेख, तात्यासाहेब चिमणे यांनी सोमवारी माघार घेतली, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
तिरंगी लढत होणार असल्यामुळे फोडाफोडीचे राजकारण होण्याची दाट शक्यता आहे. निवडणुकीत भाजपसह ६५७ मतदार सर्व मिळून आहेत. त्यामध्ये भाजप १८९, शिवसेना १४१, काँग्रेस १७०, राष्ट्रवादी काँग्रेस ८०, एमआयएम २८, रिपाइं, बसपा व इतर पक्ष, अपक्ष मिळून ४९, असे मतदार आहेत. या मतदारसंघासाठी १९ आॅगस्ट रोजी मतदान होईल. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. २२ आॅगस्ट रोजी मतमोजणी होईल. मतदानासाठी तहसीलनिहाय मतदान केंद्र असणार आहे. दोन्ही जिल्ह्यांत १७ ठिकाणी मतदान केंद्र असू शकतील.
माघारीवर विजयाचे गणितज्या उमेदवारांनी माघार घेतली आहे, त्यातील सहारे, चिमणे यांची माघार महत्त्वाची आहे. या निवडणुकीत पसंतीनिहाय मतदान होते. विजयाचे गणित माघार आणि पसंतीनुसारच होणार असून, त्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे. भाजपने जि. प. अध्यक्षपद मिळावे, यासाठी अट घालून महापौर नंदकुमार घोडेले यांना रविवारी बोलण्यास मज्जाव केल्यामुळे भाजपचे मतदार किंगमेकर ठरणार आहे. पक्ष, व्हीप आणि आदेशानुसार मतदान होणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता आहे.