औरंगाबाद: पश्चिम मतदारसंघाचे शिंदेंसेनेचे आ.संजय शिरसाट यांनी सध्या मौनं सर्वार्थ साधनम् अशी भूमिका घेत हाताची घडी तोंडावर बोट ठेवले आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंत संधी मिळेल ही त्याच्या मनी असलेली अपेक्षा कायम असल्याने त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले.
१२ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण मध्ये सभा होत आहे. या सभेची तयारी आणि इतर उपक्रमांची माहिती देण्यासाठी शनिवारी रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्या परिषदेत भुमरे यांनी आ.शिरसाट यांना बोलण्यास विनंती केली. मात्र आ.शिरसाट यांनी हाताची घडी तोंडावर बोट असल्याचा इशारा केला. त्यातच रोहयो मंत्री भुमरे यांनी आ.शिरसाट हे शांतच आहेत. आणि आता तर ते शांत झाले आहेत, असा चिमटा काढला. यावरून पत्रकार परिषदेत हंशा पिकला.
२१ जून रोजी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, चंद्रकांत खैरे, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्यावर माध्यमातून आगपाखड करण्यात आ.शिरसाट आघाडीवर राहिले. त्यामुळे त्यांना शिंदे सरकारमध्ये पहिल्या टप्प्यात मंत्रिपद मिळणार असल्याचे निश्चित होते. परंतु त्यांची मंत्रिपदाची संधी हुकली. यामागे अंतर्गत राजकारण होते. यातून नाराज झालेल्या आ.शिरसाट यांनी माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बाबत भावनिक ट्विट केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी ट्विट डिलीट केले. अधिवेशनात आ.शिरसाट यांच्या नाराजीची चर्चा मोठया प्रमाणात गाजली. त्यांच्या नाराजीचे लोन सरकारमध्ये पसरू नये, यासाठी त्यांना शांत राहण्याचा सल्ला, मुख्यमंत्री शिंदे दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मी उशिरा आलो त्यामुळे शांतमी पत्रकार परिषदेत उशीरा आलो, त्यामुळे काही बोललो नाही. माहिती नसताना उगाच काहीतरी बोलण्यात तथ्य नाही. त्यामुळे मी शांत राहिलो, असे स्पष्टीकरण आ.शिरसाट यांनी दिले. विस्तार होईल, आणि मंत्रिपद मिळेल, तोवर शांत राहायचे, असा सल्ला मुख्यमंत्री शिंदे दिला की काय, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, त्यांनी पत्रकरांना उलट प्रश्न करीत जेवणासाठी निघून गेले.- आ. संजय शिरसाट