औरंगाबाद : एखादे आंदोलन म्हटले की, निदर्शने, ठिय्या, उपोषण असेच चित्र डोळ्यासमोर येते. अनेक पक्ष, संघटना अशा प्रकारच्या आंदोलनातून जनतेची बाजू मांडतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र, गेल्या वर्षात कल्पकतेने मागण्या मांडण्याचा आणि आंदोलनाचा नवा पांयडा पाडला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कल्पक आंदोलनात जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी यांची भूमिका नेहमीच लक्षवेधी असते. निदर्शने, घोषणाबाजीबरोबर कल्पकतेच्या जोरावर आंदोलन तीव्र करून एखादा प्रश्न तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. शहरातील कचरा प्रश्न गंभीर झाल्याने या प्रश्नावर तोडगा म्हणून महापालिकेने काही दिवसांपूर्वी कचऱ्यावर कर लावण्याचा निर्णय घेतला. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त झाला. या पार्श्वभूमीवर मनसेने आंदोलन करीत पालिका प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध केला. यावेळी मनपाच्या मुख्य कार्यालयासमोर हिटलरच्या वेशभूषेत संदीप कुलकर्णी यांनी निषेध नोंदवला. त्यांच्या वेशभूषेची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली.
दहीहंडी उत्सवादरम्यान भाजप आमदारांनी केलेल्या वक्तव्याचा मनसेने निषेध केला. यावेळीही संदीप कुलकर्णी यांनी डोक्याला मुंडावळ्या बांधून सहभागी होऊन निषेध व्यक्त केला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिक्षण विभागाचा विसर पडल्याने च्यवनप्राश भेट देण्याचेही आंदोलन केले. मनपा शिक्षण व महिला बालकल्याण विभागाच्या कारभाराविरुद्ध सायकल व छत्रीदान आंदोलन केले. मनपा शाळांतील शौचालयांची दुरवस्था झाल्याने प्रतीकात्मक शौचालय भेट आंदोलनही करण्यात आले होते. अशी अनेक आगळेवेगळी आंदोलने करून मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आंदोलनात कल्पकता आणण्यासाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येक जण प्रयत्नशील असतो.
अशीही ‘मनसे स्टाईल’‘मनसे स्टाईल’ आंदोलन म्हटले की, काहीतरी गोंधळ होणार, अशी चर्चा होत असते; परंतु आंदोलन कोणत्याही गोंधळाशिवाय अगदी शांततेत आणि लक्षवेधी करता येते, हे कल्पक आंदोलनातून मनसेने दाखवून दिले आहे. त्यामुळे कल्पक आंदोलनेदेखील ‘मनसे स्टाईल’ म्हणून नावारूपाला येत आहेत.
महाभारतीय आंदोलनसंत एकनाथ रंगमंदिराची दुरवस्था झाली. त्याकडे महापालिका प्रशासनाचा कानाडोळा झाला. त्यामुळे मनविसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी ७ जुलै २०१७ रोजी डोळ्यावर काळी पट्टी बांधून आंदोलन केले.