छत्रपती संभाजीनगर : महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठाचा कुलगुरू होणे हा सर्वोच्च सन्मान आहे. विद्यापीठाचा सेवक म्हणून विद्यापीठ चालविणारे पदाधिकारी, अधिकाऱ्यांची गरज आहे. माजी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी सामाजिक दायीत्व निभावत काम केले. मात्र, आजकाल काही सदस्य आपण विद्यापीठाचे मालक असल्याप्रमाणे वागत आहेत, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात देवगिरी नागरी सहकारी बॅक व जलदूत यांच्या सहकाऱ्याने दोन बंधारे उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते ३१ मे रोजी करण्यात आले. तर आ. हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते दुसऱ्या बंधाऱ्याचे क्राँकिटीकरण, खोलीकरण मंगळवारी करण्यात आले. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. यावेळी प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, जलतज्ज्ञ सर्जेराव वाघ, प्राचार्य भारत खंदारे, बॅकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ.प्रशांत अमृतकर, डॉ.कैलास पाथ्रीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय समोरापात कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, कोणतीही जबाबदारी मिळाल्यानंतर सेवाभावातून काम केले पाहिजे. अनेकांसोबत काम करताना चांगला अनुभव आला, मात्र आजकाल काही व्यवस्थापन परिषद सदस्य विद्यापीठाचे मालक असल्यासारखे वागत असल्याचा टोलाही कुलगुरूंनी यावेळी लागावला. प्रमख पाहुणे आ. हरिभाऊ बागडे म्हणाले, सामाजिक स्वारस्थासाठी तरुणांच्या हाताला काम हवे तर नैसर्गिक संतुलनासाठी झाडे, पिकांना पाणी गरजेचे आहे. त्यामुळे झाडे लावा, पाणी जिरवा उपक्रम राबविणे गरजेही आ. बागडे यांनी व्यक्त केली. यावेळी किशोर शितोळे यांनी ही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मनाली कुलकर्णी यांनी तर आभार प्रवीण नांदेडकर यांनी मानले.