प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : आकाराने मोठे डिस्प्लेचे मोबाइल वापरण्याचा नवा ट्रेंड आला आहे. मात्र, हे मोबाइल ना हातात बसतात ना खिशात मावतात. असे मोबाइल सोबत बाळगणे अवघड होऊन बसते. हेच मोबाइल चोरणे चोरट्यांना सोयीचे ठरत आहे. हे वाचून आपणास आश्चर्य वाटेल, पण ते सत्य आहे. मागील दोन ते तीन वर्षांत जेवढे मोबाइल चोरीला गेले त्यात आकाराने मोठ्या डिस्प्लेच्या हँडसेटची संख्या जास्त आहे.
मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडिओ, कॉन्टॅक्ट नंबर एवढेच नसते तर विविध सोशल मीडिया अकाऊंटस्, बँक अकाऊंटसदेखील ओपन असतात. यामुळे मोबाइल हरविल्यावर संपूर्ण जगाशी आपला संपर्क तुटतो. बेचैनी वाढते. त्यात आता ६ इंचापेक्षा मोठे डिस्प्ले असलेले मोबाइल खरेदीची फॅशन आली आहे. मोबाइल कोणत्या कंपनीचा व किती मोठा आहे हा एक स्टेटस सिम्बॉल बनला आहे. मात्र, हेच मोबाइल आता डोकेदुखी बनले आहेत. कारण, हातात बसत नाही आणि खिशातही मावत नाही. यामुळे मोबाइल चोरांना हातातून मोबाइल हिसकावणे सोपे झाले आहे. मोठ्या डिस्प्लेचे मोबाइल वापरणे व त्यांची काळजी घेणे अवघड झाले आहे.
चौकट
शहरातील मोबाइल चोरीच्या घटना
वर्ष मोबाइल चोरीच्या घटना
२०१८--- २०२
२०१९--- १५०
२०२१--- १९०
---
चौकट
या भागांमध्ये मोबाइल सांभाळा...
१) मागील तीन वर्षांत मोबाइल चोरीच्या जास्त घटना जाधववाडी येथील भाजीपाला आडत बाजारात घडल्या आहेत.
२) याशिवाय रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बस स्टँड, औरंगपुरा, सिडको, गारखेडा परिसर, शहानुरमियाँ दर्गा चौक, निरालाबाजार हा भाग.
३) छोटा पंढरपूर, वाळूज महानगर या भागातही मोबाइल चोरीच्या घटना घडत असतात.
----
चौकट
१) मोबाइल चोरीला गेला व तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेला तर तो मोबाइल हँडसेट चोरीला नव्हे गहाळ झाला, असा उल्लेख केला जातो.
२) मोबाइल चोरीला गेल्यावर लगेच त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही. दोन ते तीन दिवसांनंतर फोन सापडला नाही तर तक्रार दाखल करून घेतली जाते.
३) मोबाइल चोरीला नव्हे, तर तो तुम्ही कुठे तरी विसरला असाल, जर सापडला नाही तर मग तक्रार नोंदवा, असेही पोलीस सांगतात, असे काही नागरिकांनी सांगितले.