औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील निवासस्थानांतील अनधिकृत रहिवाशांवर कारवाई करण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे. परिणामी, निवासस्थान आणि परिसरात अवैध उद्योग वाढीला हातभार लागत आहे.
घाटीतील निवासस्थानांच्या आवारात जुगार अड्डा सुरू असल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री पोलिसांच्या कारवाईनंतर उघडकीस आला. घाटी रुग्णालयातील निवासस्थानांतील गैरप्रकार ‘लोकमत’ने १० मार्च २०१७ रोजी ‘शासकीय क्वॉर्टर्सवर अनधिकृत ताबा’ हे वृत्त प्रकाशित करून समोर आणला. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली; परंतु अनधिकृत रहिवाशांवरील कारवाईसाठी समितीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नोव्हेंबरमध्ये जवळपास वर्ग-१ ते ४ च्या कर्मचारी, डॉक्टरांच्या जवळपास ९० निवासस्थानांची पाहणी केली. यावेळी अनेक निवासस्थानांना कुलूप लावलेले आढळले. त्यामुळे अनेकांनी कारवाईच्या भीतीने पळ काढल्याची शक्यता वर्तविण्यात आली. याप्रकरणी लवकरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले; परंतु अद्यापही कारवाईला मुहूर्तच मिळालेला नाही.
या समितीने निवासस्थानांना भेटी देऊन अनधिकृत वास्तव्य करणार्यांना नोटिसा बजावल्या; परंतु नोटिसांना कोणतीही दाद दिली जात नसल्याचे दिसते. घाटी परिसरात १९६० मध्ये जवळपास ३९८ निवासस्थाने उभारण्यात आली. यातील बहुतांश निवासस्थानांची आता पार दुरवस्था झाली आहे. यातील अनेक निवासस्थाने राहण्यायोग्य नसल्याचे बांधकाम विभागाने सांगितले आहे.