औरंगाबाद : राज्यात दंगली पसरविण्याचे षडयंत्र सुरु आहे. राज्यात आग लावायची आणि सांगायचे यांना राज्य करता येत नाही, असे विरोधी पक्षाचे काम आहे. त्या सगळ्यांना आजचा आक्रोश मोर्चा इशारा आहे. शिवसेना आग असून आगीशी खेळू नका, असे गर्जना खा. संजय राऊत यांनी केली. तसेच पेट्रोल डिझेलचे भाव पाच दहा रुपयांनी नव्हे, ५० रुपयांनी कमी करा मग महाराष्ट्रही विचार करेल, असे आव्हानही त्यांनी यावेळी केले. ते शहरात आयोजित आक्रोश मोर्चात बोलत होते.
आज दुपारी शहरातील क्रांती चौक येथून शिवसेनेचा आक्रोश मोर्चा निघाला, मोर्चात मराठवाड्यातून आलेले शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. मोर्चाचा समारोप गुलमंडी येथे झाला. समारोपाप्रसंगी झालेल्या सभेत खा. संजय राऊत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी खा. संजय राऊत म्हणाले, मला भाजपवाले विचारात मोर्चा का काढत आहात. मी म्हटले मग काय थाळ्या वाजवायच्या का ? कोरोना हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाने थोपवला गेला, थाळ्या वाजवून काही होत नाही, हे कोरोना काळात सिद्ध झाले. आता महागाई विरोधात संघर्ष करण्याची वेळ आहे, महागाईविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल.
मोदींच्या घोषणांचे काय झाले ?नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्याआधी महागाई कमी करू, दरवर्षी २ कोटी रोजगार देईल, इंधन दर कमी होईल असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले. महागाईवर बोला महटले की, चीन-पाकिस्तान, जातीय दंगली असे विषय काढायचे, असे सुरु आहे.
नवाब मलीकांमुळे जरा शांतता
मंत्री नवाब मलिक यांनी सुरु केलेल्या कार्यक्रमामुळे विरोधीपक्ष शांत झाला आहे. त्यांच्या कडे खूप आहे, अजून तर आम्ही काढलेच नाही. विरोधी पक्ष सरकार पडण्याच्या तारखा देत आहे, त्यांनी तारखा देत राहाव्या सरकार स्थिर राहील.