औरंगाबाद : नातेवाइकांकडे लग्नाला आलेल्या नाशिक येथील युवकाने पुजेत नातेवाईक व्यस्त असतानाच लग्नघरातून तब्बल ५ लाख २ हजार ५०० रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी नवरीच्या वडिलांनी क्रांती चौक ठाण्यात गुन्हा नोंदविताच गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक गाठत आरोपीस बेड्या ठोकल्या. या आरोपीकडून ४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार गांधीनगर येथील नरेश रिडलॉन यांच्या मुलीचे ९ डिसेंबर रोजी लग्न होते. लग्नासाठी आलेला नाशिक येथील अक्षय उर्फ आझाद राजेंद्र बिगानीया ( २७, रा. महालक्ष्मीचाळ, व्दारका, नाशिक) याने घरात कोणीच नसल्याची संधी साधत त्याच रात्री १ ते १.३० वाजेच्या दरम्यान चोरी केली. त्याने पहिल्या मजल्यावरील रूममधील लाकडी कपाटातून ४ लाख ३० हजार रुपये रोख, २ तोळे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख २ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी १० डिसेंबर रोजी रात्री क्रांती चौक ठाण्यात गुन्हा नोंदविला.
या गुन्ह्याचा समांतर तपास करताना सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकाने थेट नाशिक गाठले. त्या ठिकाणी आरोपी अक्षय यास ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतल्यानंतर २ लाख ८० हजार रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कामगिरी सहायक आयुक्त विशाल ढुमे, निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनात सपोनि. मनोज शिंदे, हवालदार चंद्रकांत गवळी, भगवान शिलोटे, रवींद्र खरात, विशाल पाटील, नितीन देशमुख, ज्ञानेश्वर पवार यांच्या पथकाने केली.
दीड लाख जुगारात उडविले
गुन्हे शाखेने आरोपी अक्षय यास ताब्यात घेईपर्यंत त्याने चोरलेल्या रोख पैशातील तब्बल १ लाख ५० हजार रुपयांची रक्कम जुगारात उडविली. त्याशिवाय आरोपीला दारू पिण्यासह इतरही व्यसन असल्याची माहिती समोर आली. या आरोपीच्या विरोधात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी अधिक तपास निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक विकास खटके करीत आहेत.