औरंगाबाद : सेल्समनप्रमाणे पाठीवर बॅग, डोक्यावर टोपी आणि मास्क घालून अपार्टमेंटमध्ये येऊन तो रेकी करून गेला. त्यानंतर दीड तासाने कपडे बदलून आला आणि रुग्णालयात गेलेल्या एकाचा बंद फ्लॅट फोडून सोन्याच्या दोन अंगठ्या, २२ हजार रुपये रोख, एलईडी टीव्ही आणि मिक्सर असा सुमारे ६६ हजारांचा ऐवज चोरून नेला. देवळाई परिसरातील क्रितिका रेसिडेन्सी येथे ११ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ५ दरम्यान चोरीची ही घटना झाली असून अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद झाला आहे.
कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागात लिपिक असलेले शालिकराम मैनाजी चौधर (२९) यांची पत्नी प्रसूतीसाठी ९ सप्टेंबरपासून खासगी रुग्णालयात दाखल आहे. ११ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास चौधर हे त्यांच्या फ्लॅटला कुलूप लावून रुग्णालयात गेले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ते घरी परतले असता त्यांना दाराला कुलूप दिसले नाही. आत जाऊन पाहिले असता दाराचे कुलूप बेसीनमध्ये ठेवलेले होते. बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरट्यांनी घर फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. शोकेस आणि बेडचे ड्रावर उघडून त्यातील अनुक्रमे ७ ग्रॅम आणि ५ ग्रॅमच्या दोन अंगठ्या, २२ हजार ४०० रुपयांची रोकड, उषा कंपनीचे मिक्सर, एलजी कंपनीची स्मार्ट एलईडी टीव्ही, असा सुमारे ६५ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले. या घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गजानन जाधव, उपनिरीक्षक ठुबे, हवालदार राठोड, लुटे यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. याप्रकरणी चौधर यांची तक्रार नोंदवून घेऊन चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविला. हवालदार काशीनाथ लुटे तपास करीत आहेत.
चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
भरदुपारी चोरी करणारा हा चोरटा अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रण पोलिसांनी हस्तगत केले. यात तो स्पष्टपणे दिसत आहे. बळकट शरीरयष्टी असलेल्या या चोरट्याने डोक्यावर टोपी, मास्क घातलेला आहे. २ वाजून ३६ मिनिटांनी तो अपार्टमेंटमध्ये येऊन गेला. तेव्हा त्याने पांढरा हाफ बाह्याचा शर्ट, आणि पॅण्ट, पायात सॅण्डलसारखी चप्पल घातलेली होती. त्यानंतर ४ वाजताच्या सुमारास तो चाेरी करण्यासाठी आला तेव्हा त्याने कपडे बदलल्याचे दिसून येते. त्याने अंगावर निळा हाफ बाह्याचा टी शर्ट आणि बर्म्युडा पॅण्ट घातलेली होती.