सागर भरत राजपूत यांची वाळूज एमआयडीसीत हिरा पॉलिमर्स प्रा.लि. (प्लाॅट नं.१०५) या नावाची कंपनी आहे. १७ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कंपनीतील कामकाज संपल्यानंतर कंपनीचे गोडाऊन बंद करण्यात आले. मात्र, सुरक्षारक्षक भीमराव वाघळे यांना १९ डिसेंबरला गोडाऊनचे शटर उघडे दिसले. याची माहिती त्यांनी कंपनीचे अकाऊंटंट संभाजी गिलबिले यांना दिली. ही माहिती मिळताच कंपनीचे मालक सागर राजपूत व संभाजी गिलबिले यांनी कंपनीच्या गोडाऊनमध्ये जाऊन पाहणी केली. या पाहणीत गोडाऊनमध्ये पॅकिंग बॅग तयार करण्यासाठी लागणारे रिलायन्स कंपनीचे पॉलिमर्स ग्रॅन्युलसच्या २५ किलो वजनाच्या ८४ बॅग गायब असल्याचे आढळले. हा चोरीचा प्रकार लक्षात येताच कंपनीचे अकाऊंटंट संभाजी गिलबिले यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात ९० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरी झाल्याची तक्रार दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे करीत आहेत.
--------------------------