औरंगाबाद : दुकानफोडीच्या गुन्ह्यात अटक आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी गुरुवारपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आनंद रामदास हिवाळे (२०, रा. एकतानगर, बावनघर, सातरा परिसर) असे आरोपीचे नाव आहे. नागसेननगर येथील रहिवासी कय्युम अय्युब शहा (४६) यांच्या घराच्यासमोर आदिलशहा प्रोव्हिजन किराणा दुकान आहे. दि. ७ फेब्रुवारी रोजी शहा यांनी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद केले व जेवण करून ते झोपी गेले. पहाटे दोन वाजेच्या सुमारास दुकानासमोर राहणार्या व्यक्तीने शहा यांना फोन करून तीन व्यक्ती दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न करित असल्याची माहिती दिली. चोरट्यांना शहा यांची चाहूल लागताच तिघांपैकी दोघे अंधाराचा फायदा घेत पळून गेले, तर लोखंडी टाॅमीच्या सहाय्याने दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न करणार्या विधी संघर्ष बालाकाला पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विधी संघर्ष बालकाकडे अधिक चौकशी केली असता आरोपी आनंद हिवाळे व आकाश सुनील अहिरे (२१, रा. छोटामुरलीधरनगर) यांची नावे सांगितली. हे दुकान फोडण्यापूर्वी दोन दिवस अगोदर एका घरातून दोन मोबाइल चोरल्याची कबुली त्याने दिली, त्यानुसार पोलिसांनी आनंद हिवाळे यास अटक केली. त्याच्याकडून दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.
आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली. याप्रकरणी सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी बाजू मांडली.