लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील एका संगणक विक्रीच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी २८ लॅपटॉपसह रोख रक्कम लंपास केली. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. संशयित चोरट्यांच्या हालचाली सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत.जुन्या जालन्यातील उड्डाण कॉम्प्लेक्समध्ये देविदास सर्जेराव कुहिरे (रा. डबल जीन) यांचे लॅपटॉप क्लिनिक हे संगणक विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. रविवारी पहाटे तीन चोरट्यांनी या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या १३ नवीन लॅपटॉपसह दुरुस्तीसाठी आलेले १५ जुने लॅपटॉप, तीन एलसीडी टीव्ही चोरले.एवढ्यावरच न थांबता बाजूलाच असलेल्या सुभाष सहारे यांच्या जय फर्निचर या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी रोख रक्कम लंपास केली. लॅपटॉप क्लिनिकमध्ये बसविलेल्या सीसीटीव्हीमध्ये तीन चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत.सकाळी आजूबाजूच्या नागरिकांनी दुकानात चोरी झाल्याची माहिती कुहिरे यांना दिली. कुहिरे यांनी दुकानात जाऊन पाहिले असता सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आले. त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले.उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, कदीम जालना पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक बालासाहेब पवार यांनी पाहणी केली. ठसेतज्ज्ञांसह श्वानपथकाला पाचारण करण्यात आले.श्वानाने मुख्य रस्त्यापर्यंत माग काढला. या प्रकरणी कुहिरे यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अडीच लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, जालना शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अंबड चौफुली परिसरातील महसूल कॉलनी, रुपनगर येथे दिवसाढवळ्या सायकली चोरीच्या घटना वाढल्या आहेत. रात्रीची गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
२८ लॅपटॉपसह रोख रक्कम लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:14 AM