औरंगाबाद : जालना रोडवरील ईलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दालन असलेल्या प्रतिक मार्केटिंगचे शटर उचकटुन सुमारे साडेदहा लाखाच्या एलईडी टीव्ही चोरून नेणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात सिडको आणि जवाहरनगर गुन्हे शोध पथकाला सयुंक्त यश आले. भारतनगत येथील एका घरात लपवून ठेवलेल्या १५ एलईडी टीव्ही , गुन्हा करण्यासाठी वापरलेली पल्सर मोटारसायकल आणि मालवाहू रिक्षा असा सुमारे १० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला . मुस्तफा रबुल अन्सारी ( वय २२ ., रा भारतनगर ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे . तर मुख्य आरोपी शेख जाहिद शेख गणी ( रा . भारतनगर ,गारखेडा परिसर) हा घाटी रुग्णालयात त्याच्या आजारावर उपचार घेत आहे . घाटीतून तो पळून जाउ नये म्हणून पोलिसांनी त्याच्याभोवती पहारा लावला आहे . मालवाहतूक करण्यास मदत करणारा सोहेल अंसारी हा पसार असून त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला .
याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की जालना रोडवरील प्रतीक मार्केटिंग या दालनाचे शटर उचकटून त्यांनी 27 मे रोजी रात्री 27 एलईडी टीव्ही चोरून नेल्या होत्या . याविषयी दुकान मालक लकजित सिंग केसर सिंग दुमडा यांनी जवाहर नगर ठाण्यात तक्रार नोंदविली होती . पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद , उपायुक्त डॉ. राहुल खाडे , सहाय्यक आयुक्त रवींद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनखाली जवाहर नगर पोलिसांनी तपास सुरू केला होता . या तपासादरम्यान पोलिसांनी शहरातील विविध सीसीटीव्ही कॅमेराचे छायाचित्रण तपासले होते . संशयित आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते . चोरट्यांच्या वर्णनावरून तसेच माल नेण्यासाठी आरोपींनी वापरलेले वाहनाचे वर्णन याआधारे तपास करीत असताना चोरी गेलेला माल पुंडलिक नगर परिसरातील भारत नगर येथे लपविण्यात आल्याची माहिती खबर्याने सिडको पोलिसांना दिली . यानंतर सिडको आणि जवाहर नगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने संयुक्त तपास करीत संशयित आरोपी शेख जाहेदच्या घरावर छापा टाकला . त्यावेळी घराला बाहेरून कुलूप लावलेले होते . तर घराच्या गच्चीवर आरोपी मुस्तफा पोलिसांना पाहून लपल्याचे दिसले . यामुळे पोलिसांचे एक पथक शेजारील घरावरून संशयित घराच्या गच्चीवर गेले आणि मुस्तफा ला पकडले . त्याच्या जवळील चावीने दाराचे कुलूप उघडण्यात आले . तेव्हा त्या घरात लपवून ठेवलेल्या १५ एलईडी टीव्ही पोलिसांना दिसल्या . तर घरासमोर गुन्हेगारांनी वापरलेली पल्सर मोटरसायकल मिळाली . पोलिसांनी आरोपी मुस्तफाला अटक करीत १५ एलईडी टीव्ही आणि मोटरसायकल जप्त केली .
आरोपीनी अशी केली चोरीआरोपी शेख जाहीद हा या गुन्ह्याचा मास्टर माइंड आहे . जाहिद आणि मुस्तफा हे २७ मे च्या रात्री मोटरसायकलवर प्रतीक मार्केटिंग येथे गेले . शटर उचकटुन आत प्रवेश केल्यानंतर २७ एलईडी टीव्ही त्यांनी दुकानाच्या दारात आणून ठेवल्या . यानंतर आरोपी सोहेल याला रिक्षा घेऊन बोलावले . पंधरा मिनिटात सर्व महाल रिक्षात भरून आरोपी तेथून मुकुंदवाडी मार्गे भारत नगर येथे गेले . दिवसभर रिक्षा झाकून ठेवल्यानंतर रात्री अंधारात त्यांनी रिक्षातील टीव्ही घरात नेऊन लपवून ठेवल्या . अशी माहिती तपासात समोर आली . चौकट चोरीच्या दुसऱ्या दिवशी आरोपी घाटीत झाला ॲडमिट २७ मे च्या रात्री मोठी चोरी केल्यानंतर आरोपी जाहेद हा त्याच्या आजारावरील शास्त्रक्रियेसाठी घाटीत दाखल झाला . दोन दिवसानंतर त्यांच्यावर शास्त्रक्रिया करण्यात आली .
यांनी केली कामगिरीजवाहरनगर क्गे पोलीस निरीक्षक संतोष पाटील , सिडको ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रध्दा वायदंडे , फौजदार भरत पाचोळे , शशिकांत तायडे ,निवृत्ती गायके ,बाळासाहेब आहेर , कर्मचारी मनोज अकोले , सुखदेव जाधव , विजय वानखेडे ,बद्रीनाथ जाधव ,नंदूसिंग परदेशी , अंकुश चव्हाण , प्रदीप दंडवते , पांडुरंग तुपे , योगेश चव्हाण समाधान काळे , विजय बमनावत , राजेश बनकर , नरसिंग पवार , प्रकाश डोंगरे , सुरेश भिसे , किशोर काळे , विशाल सोनवणे आणि स्वप्नील रत्नपारखी .