औरंगाबाद: मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी तिरुपतीला गेलेल्या उद्योजकाचा बंगला चोरट्यांनी फोडला. मात्र, सुमारे १०० तोळे सोन्याचे दागिने आणि १० लाखांची रोकड ठेवलेल्या पेटीपर्यंत चोरट्यांना जाता आले नाही. त्यामुळे तो ऐवज बचावल्याची घटना बुधवारी सकाळी प्रतापनगरात उघडकीस आली. पोलीस आयुक्तांसह दोन उपायुक्त, सहायक आयुक्त आणि चार पोलीस निरीक्षक फौजफाट्यासह तेथे दाखल झाले होते.
प्रतापनगरातील पवनसूत बंगल्यात डॉ.सुषमा जयंत सोनी आणि त्यांचे उद्योजक पती जयंत सोनी हे दोन मुलींसह राहतात. डॉ.सुषमा यांचे त्यांच्या बंगल्यासमोर अक्षय डेंटल क्लिनिक आहे. जयंत यांचा वाळूज औद्योगिक वसाहतीत लघू उद्योग आहे. त्यांच्या मुलीच्या उपचारांसाठी डॉ.सुषमा या ८ दिवसांपूर्वी तिरुपती येथे गेल्या. मुलीवर शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे २३ फेब्रुवारी रोजी जयंत हे बंगल्याला कुलूप लावून तिरुपतीला गेले. बंगला व कारची साफसफाई करण्यासाठी बंगल्याच्या गेटची चावी नोकराकडे दिली होती. बुधवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास कामगार इमरान मिर्झा हे बंगल्यात गेले असता, त्यांना मुख्यदाराचे लॅच लॉक तोडलेले आणि दार उघडे दिसले. चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी ही बाब सोनी दाम्पत्याला फोन करून कळविली. या दाम्पत्याने पोलिसांना या घटनेची माहिती देऊन त्यांच्या घरात सुमारे १०० तोळे सोन्याचे दागिने आणि रोख १० लाख रुपये होते, असे सांगितले. हा आकडा ऐकून पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे, दीपक गिऱ्हे, गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त रवींद्र साळोखे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, सुरेंद्र माळाळे, दिलीप तारे, सपोनि घनश्याम सोनवणे, मनोज शिंदे आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉ.सुषमा यांनी त्यांच्या प्राध्यापक मैत्रिणीला घरी पाठवून बंगल्यात त्यांनी ठेवलेले दागिने आणि रक्कम सुरक्षित आहे अथवा नाही हे पाहण्यास सांगितले. पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत त्यांनी बंगल्याची तपासणी केली असता, गुप्त कपाटात सर्व किमती ऐवज आणि रोकड सुरक्षित असल्याचे दिसले. यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला.
======
चौकट
घटनेचा सखोल तपास करणार
एकही रुपयांची वस्तू चोरीला गेली नसली, तरी आम्ही या घटनेचा सखोल तपास करू आणि आरोपीना अटक करू, अशी माहिती पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी दिली. डॉ.सुषमा यांच्या वतीने निवृत्त पोलीस उपअधीक्षक नरेश मेघराजानी यांनी उस्मानपुरा ठाण्यात चोरट्याविरुद्ध फिर्याद नोंदविली.
==================
चौकट
दोन कपाटे फोडली
चोरट्यांनी बंगल्यात घुसल्यावर वरच्या मजल्यावरील बेडरूममधील कपाट उघडून त्यातील सामान अस्ताव्यस्त फेकले. बंगल्यातील अन्य खोल्यांत मात्र चोरटे गेले नाहीत.
==============
ना सीसीटीव्ही ना सुरक्षारक्षक
बाहेरगावी जाताना बंगल्याच्या सुरक्षेसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. ना तेथे सीसीटीव्ही होता, ना सुरक्षारक्षक नेमला होता, ही संधी चोरट्यांनी साधली.