औरंगाबाद : उस्मानपुऱ्यातील प्राध्यापकाचा बंद फ्लॅट भरदुपारी फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि ८ हजारांची रक्कम लंपास केली. याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, शासकीय तंत्रनिकेतन येथील विभागप्रमुख प्रा. राजू तुकाराम पचकोर हे उस्मानपुरा येथील अक्षय अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांची पत्नी दिवाळीपासून गावी गेलेली आहे. २२ डिसेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास ते फ्लॅटला कुलूप लावून तंत्रनिकेतनमध्ये गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी दाराचा कडी-कोंडा तोडला. बेडरूममधील कपाट फोडून सोन्याचे चार तोळ्यांचे दागिने आणि रोख ८ हजार रुपये घेऊन आरोपी पसार झाले. दुपारी २ वाजेच्या सुमारास जेवण करण्यासाठी प्रा. पचकोर हे घरी परतले तेव्हा त्यांना फ्लॅटचा कडी-कोंडा तुटलेला दिसला. त्यांनी उस्मानपुरा पोलिसांना माहिती कळविली. चोरट्यांनी कपाटातील ३.४ ग्रॅमचे कानातील झुंबर, १० ग्रॅम मण्याची सोन्याची पोत, ओम पत्ते २, रिंग, नथ, सोन्याच्या दोन अंगठ्या आणि रोख ८ हजार, चांदीचे ताट, वाटी, प्लेट, अत्तरदाणी, असा ऐवज पळविल्याचे पोलिसांना दिसले.
=============
चौकट
आदल्या दिवशी वॉचमन गेला गावाला
अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावर गोपाल नावाचा वॉचमन सहपरिवार राहतो. मात्र, तो २१ डिसेंबर रोजी गावाला गेल्याचे त्यांना समजले. त्यांच्या समोरील फ्लॅटमधील रहिवासी कंपनीत नोकरी करतात. ते रोज सकाळी कामावर जातात आणि सायंकाळी घरी येतात. ही संधी चोरट्यांनी साधली. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.