छत्रपती संभाजीनगर : कॅनॉट प्लेस भागातील व्यापाऱ्यांमध्ये दररोज होणाऱ्या गुंडागर्दीमुळे त्रास सहन करावा लागत होता. सिडको पोलिसांनी गुंडागर्दीला आळा घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता चोरट्यांनी कॅनॉटमधील व्यापाऱ्यांच्या दुकानांकडे मोर्चा वळवला आहे. कॅनॉट व्यापारी संघटनेच्या अध्यक्षाची मोबाईल शॉपी शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी फोडली. या दुकानातुन ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. या प्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सिडको पोलिसांनी दिलेल्या माहिती कॅनॉट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खर्डे यांच्या रेणुका ॲण्ड मल्टी सर्व्हीसेस नावाची मोबाईल शॉपी आहे. या मोबाईल शॉपीचे शटर उचकटून चोरट्यानी पहाटे ३ वाजेच्या सुमारास दुकानात प्रवेश केला. दुकानातील रोख ४० हजार रुपये, २० हजार रुपये किंमतीचे फायर बोल्ट व बोट कंपनीचे १० स्मार्ट वॉचेस, २० हजारांचे १० एअरबड्स, १० हजारांचे १० की पॅड आणि ५ हजार रुपयांचे ५ मोबाईल चार्जर चोरट्यांनी लंपास केले. एकुण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. या प्रकरणी खर्डे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला.
चोरटे सीसीटीव्ही कैददरम्यान, मोबाईल शॉपीमध्ये शिरल्यानंतर दोन चोरटे आतमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. हे चोरटे अर्धा तासापेक्षा अधिक वेळ मोबाईल शॉपीमध्ये सामानाची शोधाशोध करीत होते.