औरंगाबाद - सिडको भागात चोरांनी धुमाकूळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकाच रात्री मेडिकलसह देशी दारूचे दुकान फोडून रोखीसह लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना २७ सप्टेंबरच्या रात्री घडल्या. त्याशिवाय दोन दुचाकी चोरीच्या घटनाही समोर आल्या आहेत.
अक्षय शिवाजीराव पाटील (रा. सनी सेंटर, पिसादेवी रोड) यांचे चिश्तिया चौकात मेडिकल आहे. त्यांचा मावस भाऊ महेश घरत रात्री दुकान बंद करून घरी गेला. चोराने मध्यरात्री मेडिकलच्या पाठीमागील दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. रोख २८ हजार २२० रुपये, १५ हजाराचे घड्याळ आणि मोबाइल असा ऐवज लांबविला. त्याच रात्री सनी सेंटर भागात असलेले देशी दारूच्या दुकानाचे शटर उचकटून चोराने दारूचे ३४ बॉक्स लंपास केले. रवी नंदलाल रूपलाल जैस्वाल यांचे सनी सेंटर येथील गाळा क्रमांक १६,१७ आणि १८ मध्ये देशी दारूचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते २६ सप्टेंबर रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेले. मध्यरात्री चोराने दुकानाचे शटर उचकटून देशी दारूचे ३४ बॉक्स आणि सीसीटीव्ही कॅमेरे असा एक लाख आठ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
दोघांच्या दुचाकी लंपास
गणेश भिसन पगारे (रा. सिद्धार्थ नगर, एन-१२) यांनी २५ सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास संजय गांधी मार्केट, एन-९ येथे दुचाकी (एमएच २० एफएक्स ९१३१) उभी केली होती. चोराने हॅण्डललॉक तोडून दुचाकी लंपास केली. अक्षय रमेश लाळे (रा. गजानन नगर, गल्ली क्र ४, गारखेडा) याने २४ सप्टेंबर रोजी रात्री दुचाकी (एमएच १२ एफएच ३२७५) घरासमोर उभी केली होती. मध्यरात्रीतून चोराने दुचाकी हॅण्डललॉक तोडून लंपास केली.