लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : परळी रोडवरील समद जिनिंगच्या पाठीमागील विनायक महाजन यांच्या आखाड्यावर गुरुवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास ५ चोरट्यांनी तीन आखाड्यांवर धुमाकूळ घातला. चोरट्यांनी तिघांना मारहाण केली असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२६ आॅक्टोबर रोजी रात्री साडेनऊ च्या सुमारास बबन नारायण मोरे (रा.चिंचटाकळी) हे त्यांची पत्नी लक्ष्मीबाई मोरे, मुलगा आकाश मोरे यांच्या समवेत आखाड्यावर वास्तव्याला होते. रात्री ९.३० ते १० वाजेच्या सुमारास चार चोरटे चाकू, काठ्या घेऊन व तोंडाला रुमाल बांधून आखाड्यावर आले. लक्ष्मीबाई व आकाश यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. लक्ष्मीबाई मोरे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढून घेतली. तसेच रोख एक हजार रुपये चोरुन नेले. आकाश यास चाकू लावून ‘पैसे कुठे आहेत, पैसे द्या’, असे म्हणत मारहाण केली. जखमी आकाश व त्याच्या आईने चोरांना हिसका मारून घरात धाव घेतली. काही वेळाने जखमी आकाशला गंगाखेड रुग्णालयात दाखल करण्यात आले. चोरट्यांनी संत जनाबाई मंदिर कमानीजवळील लव्हाळे यांच्या आखाड्यावरील विष्णू सोळंके, बालाजी डहाळे यांचा गडी एकनाथ यांनाही मारहाण केली. ही माहिती समजताच डीवाएसपी नारायण शिरगावकर, उपनिरीक्षक भाऊसाहेब मगरे, राहुल बहुरे, रवि मुंडे, पोलीस कर्मचारी प्रदीप सपकाळ, प्रल्हाद मुंडे, सुग्रीव कांदे, बळीराम करवर, नरसिंग शेल्लाळे, श्रीकृष्णा तंबूर आदी कर्मचाºयांनी पप्पू मोटे, प्रकाश लव्हाळे, गोलू चायल, गजानन डहाळे, किरण जोशी, वैभव भोसले, भगवान लव्हाळे, विष्णु सोळंके आदी नागरिकांच्या मदतीने रात्रीच्या वेळी परळी रोड, महातपुरी, भांबरवाडी शिवार, परभणी रोड, शहराजवळील जनाबाई मंदिराच्या पाठीमागील परिसर पिंजून काढला. मात्र चोरटे सापडले नाहीत. दरम्यान, बबन मोरे यांच्या फिर्यादीवरुन गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक रवि मुंडे, गणेश वाघ तपास करीत आहेत. दरम्यान, स्थानिक गुन्हा शाखेचे जमादार सुरेश डोंगरे, केशव नाईक यांनी विनायक महाजन, लव्हाळे, डहाळे यांच्या शेख आखाड्याची पाहणी केली. बबन मोरे, विष्णू सोळंके, एकनाथ जोगदंड यांच्याशी संवाद साधून चोरट्यांच्या वर्णनाची माहिती घेतली.
शेत आखाड्यांवर चोरट्यांचा धुमाकूळ; एक जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:34 AM