औरंगाबाद : हरयाणातील भुडवास मुलथान १० मेवात येथील दोन चोरट्यांनी शहरातील तीन बँकांच्या एटीएममध्ये फेरफार करीत पैसे चोरल्याची कबुली आतापर्यंत दिली आहे. यात बँक ऑफ इंडियाच्या उस्मानपुरा भागातील एटीएममधून ५० हजार रुपये काढले असल्याची माहिती समोर आली आहे. बँकेच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून या भामट्यांविरोधात उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बीड बायपास परिसरातील पैठण रोडजवळील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये बिघाड करून ॲक्सिस बँकेच्या डेबिट कार्डचा वापर करून पैसे काढताना दोघांना बँकेच्या अधिकाऱ्यांसह सातारा पोलिसांनी अटक केली होती. दोन आरोपींमध्ये मोहम्मद याह्या खुर्शिद (२१) व जाकीर खुर्शिद (२३, रा. भुडवास मुलथान १०, मेवात, जि. नुह, हरियाणा) याचा समावेश आहे. या दोघांना सातारा पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. यात दोघांच्या चौकशीत त्यांनी बीओआय बँकेच्या एटीएममधून ५० हजार रुपये काढल्याची कबुली दिली आहे. यानुसार उस्मानपुरा भागातील मंडळ रोडवरील बँक ऑफ इंडियांच्या एटीएममध्ये दोघा आरोपींनी वडिलांच्या नावाने असलेल्या ॲक्सिस बँकेच्या डेबिट कार्डचा वापर करून एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड केला. हा बिघाड करून बँकेतून पाच वेळा ट्रान्झेक्शन करून प्रत्येक वेळी १० हजार रुपये प्रमाणे ५० हजार रुपये काढले असल्याची माहिती समोर आली. सातारा पोलिसांनी याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांना दिली. यानुसार अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, २४ जुलै रोजी एटीएममधून पैसे गेल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून कृष्णा तुपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही आरोपी सातारा पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची कोठडी संपल्यानंतर आरोपींचा ताबा उस्मानपुरा पोलिसांना मिळणार आहे.
चाैकट,
पैसे जाण्याकडे बँकांचे दुर्लक्ष
एटीएममधून फ्रॉड करून पैसे काढणारी टोळीच सक्रिय झालेली आहे. सायबर पोलिसांनी पकडलेल्या टोळीकडूनही शहरातील एसबीआय बँकेच्या एटीएममधून १३ लाख रुपये चोरीला गेल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतरही हे प्रकार थांबलेले नाहीत. या पकडलेल्या चोरट्यांनी शहरातील तीन ठिकाणच्या एटीएममधून मागील काही दिवसांत पैसे काढले असल्याचे चौकशीत समोर आले आहे.