औरंगाबाद: जालन्यातून चोरी झालेली दुचाकी चोरट्यांनी औरंगाबादेतील शहानूरमियॉ दर्गा परिसरात आणून सोडली. वाहतूक शाखेच्या पोलिसांना ही दुचाकी आढळल्यानंतर त्यांनी संबंधितास बोलावून घेतले. ८ दिवसांपूर्वी चोरी झालेली गाडी पाहून मालकाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
पोलीस शिपाई सोहेल शेख व पोलीस नाईक जमील शेख गुरूवारी सकाळी दर्गाचौकात जात होते. फळविक्रेते फिरोज खान यांनी त्यांना बोलावून घेतले. बाजूलाच उभी दुचाकी (एम एच २१ झेड २१३१) दाखवून ती ७ ते ८ दिवसांपासून बेवारस उभी असल्याचे सांगितले. पोलिसांनी वाहतूक शाखेच्या ई-चलन मशीनवर दुचाकीचा क्रमांक टाकून मालकाचे नाव शोधले. ती दुचाकी हुकूमचंद यांच्या नावावर नोंद असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांचा मोबाईल नंबर मिळवून संपर्क साधला व दुचाकीची माहिती घेतली. सदर दुचाकी ८ डिसेंबरला चोरीला गेली होती. ती तक्रार जालना तालुका पोलीस ठाण्याला दिलेली आहे. पोलिसांनी गाडी सापडल्याचे सांगून हुकूमचंद यांना औरंगाबादेत बोलावून घेतले.
सोहेल शेख यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक देशमुख यांना दिली. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार सदर दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली. जालना तालुका पोलीस ठाण्याचे पोहेकाॅ कक्कड यांनाही औरंगाबादेत बोलावून घेतले. जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना असल्याने ती दुचाकी त्यांच्याकडे सुपूर्द केली. गुन्हा दाखल असल्याने न्यायालयातून ऑर्डर आणल्यानंतर दुचाकी त्यांना ताब्यात दिली जाईल.
ई-चलन मशीनमुळे सापडला पत्ता
पोलीस दलात आलेल्या नवीन तंत्रज्ञानाची पोलिसांनी योग्य वेळेला मदत घेतल्याने गुन्हा उघडकीस आला. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्ह्याचे प्रमाण घटविण्यासाठी प्रयत्न सातत्य ठेवावे, असे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी अधिकारी व विभागालाही सुचविले.