औरंगाबाद : वर्तमानपत्र विक्रेता असल्यासारखे हातात पेपर घेऊन अपार्टमेंटमध्ये घुसलेल्या चोरट्याने एका उघड्या फ्लॅटमधून ६ तोळ्याची सोनसाखळी आणि लॅपटॉप असा सुमारे सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास संग्राम नगर उड्डाणपुलाजवळ तिरुमला कॉंप्लेक्स मध्ये घडली.
या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, संगणक विक्रेता संजय ओम प्रकाश अग्रवाल(४७)हे तिरूमला कॉम्प्लेक्समध्ये राहतात. आज सकाळी ८ वाजता व्यायामशाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडले. त्यावेळी त्यांच्या घराचा समोरचा दरवाजा उघडा होता. तर पत्नी मीनाक्षी या स्वयंपाक घरात काम करीत होत्या. सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास हातामध्ये वर्तमानपत्रे घेऊन एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या कॉंप्लेक्समध्ये घुसला. तो थेट तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या अग्रवाल यांच्या फ्लॅटवर गेला. दार उघडेच असल्याने तो थेट हॉलमध्ये गेला.
येथील सोफ्याच्या खुर्चीवर ठेवलेला लॅपटॉप, साईबाबा आणि टेबलवर ठेवलेली तिरुपती बालाजीचे सोन्याचे पदक असलेली ६ तोळ्याची सोनसाखळी चोरून तो पळून गेला. हॉलमध्ये आवाज आल्याने स्वयंपाक घरात काम करणाऱ्या मीनाक्षी बाहेर आल्या तेव्हा यांना त्यांच्या घरातून कोणीतरी बाहेर गेल्याचे दिसले. यानंतर त्यांनी व्यायाम शाळेत गेलेल्या संजय यांना फोन करून घरी बोलावून घेतले. तेव्हा चोरट्याने घरात घुसून सहा तोळ्यांचे दागिने आणि २० हजाराचा लॅपटॉप चोरीला गेल्याचे दिसले. या घटनेप्रकरणी त्यांनी जवाहर नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक भरत पाचोळे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धावून पंचनामा केला.
चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद अग्रवाल त्यांच्या घरातून सुमारे सव्वा तीन लाखाचा ऐवज पळविणारा चोर कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.