छत्रपती संभाजीनगर : पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्याला कामानिमित्त गेलेल्या कर्मचाऱ्याच्या घरातून २ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. ही घटना मिटमिटा परिसरातील गिरजानगर येथे २२ ते २४ ऑगस्ट दरम्यान घडली. या प्रकरणी २६ ऑगस्ट रोजी छावणी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
भाऊसाहेब दादाराव गंडे (रा. गिरजानगर, मिटमिटा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २२ ऑगस्ट रोजी गंडे हे सहपरिवार बाहेरगावी गेले होते. २४ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता त्यांचे शेजारी विष्णू दरेकर यांनी फोन करून तुमच्या घराचा दरवाजा तुटलेला असून घरात चोरीचा संशय असल्याची माहिती दिली.
त्यावरून गंडे यांनी नातलगास फोन करून पोलिसांना माहिती देण्यास सांगितले. शनिवारी गंडे परत आले. त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप, कोंडा, दरवाजा तुटलेला दिसून आला. २ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. घटनेनंतर पोलिस निरीक्षक कैलास देशमाने, तपासी अधिकारी उपनिरीक्षक गणेश केदार आदींनी घटनास्थळाला भेट दिली.
चाेरीला गेलेला मुद्देमालपोलिस कर्मचारी भाऊसाहेब गंडे यांच्या घरातून ३ तोळे सोन्याचे गंठण, दोन तोळ्यांच्या तीन अंगठ्या, ४ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, अर्धा किलो चांदीचा गणपती आणि २२ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. अधिक तपास उपनिरीक्षक केदार करीत आहेत.